मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदार हे कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. आज दुपारी त्यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दरम्यान, या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे. सत्तेत येण्यासाठी आम्ही नवस केला होता, असं शिंदे गट सांगतो. मात्र, पहिल्यांदा गुवाहाटीला जाण्यापूर्वी ते सत्तेतच होते. मग त्यांनी केलेला नवस हा भाजपाला सत्तेत आणण्यासाठी असावा, असे ते म्हणाले. यासंदर्भात त्यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – VIDEO: “ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर…”, जिजाऊंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
“राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटातील आमदार सत्तेत आल्यानंतर नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेल्याचे सांगत आहेत. मात्र, ते सत्तेच होते. ते स्वत: मंत्री होती. त्यांचे सहकारी सुद्धा मंत्री होती. मात्र, तरीही कामाख्या देवी त्यांच्या नवसाला पावली असेल, तर त्यांचा नवस भाजपाला सत्तेत आणण्यासाठी असावा, असा खोचक टोला ठाकरे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला लगावला आहे. आता त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता महाराष्ट्राची होणारी अधोगती थांबावी, यासाठी नवस करावा”, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना रामदेव बाबांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
“गेल्या काही दिवसांत भाजपाचे लोकं बेलगामपणे बोलत आहेत. बेछुट आरोप करणं, चारित्र हरण करणं आणि राजकारणात आम्हीच कसे सभ्य आहोत, हे दाखवण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, रामदेव बाबा यांनी महिलांबाबत जे वक्तव्य केलं आहे, हेच रामदेव बाबा जर भाजपाचे हिंतचिंतक नसते किंवा हेच वक्तव्य दुसऱ्याने केले असते. तर भाजपाने संपूर्ण राज्यात, देशात हैदोस घातला असता. त्यांनी याचा दोष थेट उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांनी दिला असता. मात्र, आज रामदेव बाबा भाजपाचे हिंतचिंतक असल्याने भाजपाची लोकं शांत आहेत”, असे ते म्हणाले.
दरम्यान, गुणरत्न सदावर्तेंच्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरही प्रतिक्रिया दिली. “गुणतत्न सदावर्ते हे भाजपाचे समर्थक आहेत. त्यांनी वेगळा विदर्भ करण्याची मागणी केली आहे. हीच मागणी भाजपाचे लोकही करत होते. ही मागणी भाजपाच्या निवडणूक घोषणापत्रातही होती. त्यामुळे भाजपाने शांत राहायचं आणि इतरांना बोलायला लावायचे त्यातला हा प्रकार आहे. ते कधी मराठी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतात. कधी एसटी कर्मचाऱ्यांचे समर्थन करतात. त्यामुळे या सर्वाच्या मागे भाजपाचे षडयंत्र नाही ना, याचा शोध घेण्याची गरज आहे”, असेही ते म्हणाले.