मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत गटबाजीचे राजकारण भोवले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विशेषत: राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक व जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याशी घेतलेला ‘पंगा’ जाधव यांच्या गच्छंतीला कारणीभूत ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात  सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्याऐवजी सहा नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला व त्यांचा शपथविधीही पार पडला. वगळण्यात आलेल्या सहाजणांमध्ये नगरविकास राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव यांचा समावेश आहे. जाधव यांना का वगळण्यात आले याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. वास्तविक नगरविकास  व संसदीय कार्यमंत्री म्हणून राज्यमंत्री जाधव यांची कामगिरी चांगली असून, ते एक उत्तम वक्ते म्हणूनही ओळखले जातात. तसेच त्यांनी आपल्या मंत्रिपदाच्या साडेतीन वर्षांत रत्नागिरी जिल्ह्य़ात शिवसेनेच्या वाढत्या प्रभावाला समर्थपणे रोखण्यात यश मिळविले होते. त्यांची ही जमेची बाजू विचारात घेऊन त्यांना राज्य मंत्रिपदावरून कॅबिनेट मंत्रिपदावर बढती दिली जाईल, अशी खात्री जाधव यांचे समर्थक बाळगून होते, परंतु जाधव यांना पायउतार व्हावे लागले. आणि त्यांच्या जागी रत्नागिरीचे तरुण तडफदार आमदार उदय सामंत यांची वर्णी लागली.
कोकणात अर्थात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लहान-मोठय़ा गटात विभागला गेला आहे. राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक व जलसंपदामंत्री सुनील तटकरे, चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम, आमदार उदय सामंत, जिल्हाध्यक्ष शेखर निकम आदी स्वपक्षातील सहकाऱ्यांसह उद्योगमंत्री नारायण राणे व खासदार डॉ. नीलेश राणे या काँग्रेस नेत्यांशी एकाच वेळी पंगा घेण्याचे धारिष्टय़ भास्कर जाधवांनी दाखविले, ही वस्तुस्थिती असली तरी त्यांचे हे धारिष्टय़च त्यांच्या अंगलट आले आहे. शिवाय आपल्या मुलांच्या लग्नाच्या वेळी केलेली भपकेबाजी तसेच चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला न जुमानता ‘आपले’ उमेदवार उभे करून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजीही ओढवून घेतली होती. चिपळूण येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या स्वागताची सर्व सूत्रे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी आपल्या हाती घेतली, त्यास स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून जाधव यांनी विरोध केला. त्यामुळे तटकरे व जाधव या दोन नेत्यांमध्ये संघर्ष उफाळून आला. आणि याची परिणती भास्कर जाधव यांचे मंत्रिपद जाण्यात झाली, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Story img Loader