शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तुंबळ खडाजंगी पाहायला मिळाली. राज्यातील वीजजोडणी आणि कनेक्शन कापण्याच्या मुद्द्यावरून लक्षवेधी चर्चेदरम्यान ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी आधी पंतप्रधानांनी नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचं विधान केलं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेतल्यानंतर भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल करून दाखवली. यावरून सभागृहात विरोधकांनी गोंधळ सुरू केला.

देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांनी माफी मागावी अशी मागणी केल्यानंतर गोंधळ सुरू झाला. तेव्हा सभागृह काही काळ तहकूब करण्यात आलं. त्यानंतर सभागृह सुरू होताच भास्कर जाधवांनी बिनशर्त माफी मागितली. मात्र, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना देखील त्यांनी टोला लगवला.

“मी माफी मागावी असा आग्रह विरोधी सदस्यांकडून होतो आहे. अशा प्रकारचे प्रसंग या सभागृहात अनेकवेळा आले. एखाद्या गोष्टीसाठी माफी मागितल्याने माणूस लहान होतो असं नाही”, असं भास्कर जाधव म्हणाले.

फक्त दिलगिरीच नाही, बिनशर्त माफी

“मी कोणताही असंसदीय शब्द वापरलेला नाही. मी अंगविक्षेप मागे घेतो, शब्द मागे घेतो म्हटलं तर देवेंद्र फडणवीसांना मान्य नाही. पण या सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालायचं असेल आणि मी पंतप्रधानांबद्दल बोलल्यामुळे सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील, तर नुसती दिलगिरीच नाही, तर मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो. जे पंतप्रधान पूर्वी बोलले होते, तोच मी उल्लेख केला, तरी देखील मी माफी मागतो”, असं भास्कर जाधव म्हणाले.

“मी हक्कभंगासाठी तयार आहे”

“कोणताही असंसदीय शब्द न वापरता आपण मला माफी मागायला सांगितली. पण विरोधी पक्षनेत्यांनी संगितलं की आम्ही हक्कभंग आणणार आहोत. त्यांनी जरूर आणावा, मी त्यासाठी तयार आहे”, असं आव्हान देखील त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं.

भास्कर जाधवांनी केली नरेंद्र मोदींची नक्कल, विधानसभेत खडाजंगी; फडणवीसांनी केली निलंबनाची मागणी!

“ऊर्जा विभागाच्या लक्षवेधीमध्ये सुधीर मुनगंटीवार भाष्य करत होते. त्यांच्या मुद्द्यांना नितीन राऊत उत्तर देत होते. त्यांनी उल्लेख केला की पंतप्रधानांनी देखील ५० लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू असं सांगितलं होतं. फडणवीसांनी त्यावर हरकत घेतली. त्यांची हरकत बरोबर होती. आम्ही एकाच शाळेत थोडंफार शिकलो आहोत. ते वरच्या वर्गात गेले आम्ही खालच्या वर्गात आहोत. त्यांनी शब्दच्छल केला. ते म्हणाले की नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून बोलले नाहीत. अर्थात मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी प्रचाराच्या सभांमधून हे बोलले”, असं म्हणत भास्कर जाधवांनी फडणवीसांना टोला लगावला.

“..तेव्हा मुनगंटीवार काय म्हणाले हे मला माहितीये”

“तेव्हा विरोधी पक्षनेते जे बोलले, तेच मी बोलले. ते बोलताना त्यांचं म्हणणं मी अंगविक्षेप केला. सामान्यपणे मी बोलत असताना माझे हातवारे होतात, हलणं होतं. पण तरीदेखील मी बोलण्याच्या ओघात माननीय पंतप्रधानांची नक्कल केली असेल. त्यांनी माझ्यावर हा आक्षेप घेतलेला नाही, की भास्कर जाधव यांनी कुठल्याही प्रकारे असंसदीय शब्द वापरला. २७-२८ वर्षांत सुधीर मुनगंटीवारांवर अनेकदा माफी मागायची वेळ आली आहे. विलास पाटील अधअयक्षस्थानी असताना ते काय बोलले होते हे मला माहिती आहे”, असंही भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

Story img Loader