अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत. पक्षात फूट पडली नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार ‘इंडिया’ आघाडीतच आहेत. समुद्रात सुई टाकून शोधत बसा, अशा पद्धतीने शरद पवार वातावरण निर्माण करतात, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
भास्कर जाधव म्हणाले, “शरद पवारांच्या विधानानंतर अनेकजण आपापल्या परीने अर्थ काढतात. पवारांनी मांडलेल्या भूमिकेचं लॉजिक शोधण्यात अनेकांची हयात गेली आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या आमदारांविरोधात शरद पवार लढाई लढत आहे. बीड, येवल्यानंतर शरद पवार कोल्हापूरात सभा घेत आहेत. मैदानाबरोबर कायदेशीर लढाईही शरद पवार लढत आहेत. जयंत पाटील यांनी ९ आमदारांविरोधात तक्रारही दाखल केली आहे.”
हेही वाचा : “भाजपाबरोबर तडजोड करू शकलो असतो, पण…”, उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान
“आपला एखादा शब्द आपल्यालाच अडचणीचा ठरू नये, याची काळजी शरद पवार घेत आहेत. शिवसेनेचं काय चुकलं यावर भरपूर चर्चा झाली आहे. पण, शरद पवार प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलत आहेत. शरद पवार शेवटपर्यंत भाजपाबरोबर जाणार नाहीत, ही माझी खात्री आहे,” असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : “मी असं म्हणालोच नाही”, ‘त्या’ विधानावर शरद पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “सुप्रिया सुळे…”
“अजित पवारांना अपात्र व्हायचं नसेल, तर ते परत येऊ शकतात. कारण, शरद पवार अजित पवारांसमोर दुसरा मार्गच ठेवणार नाहीत”, असेही भास्कर जाधव यांनी म्हटलं.