शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. भिडेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलनं केली. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत संभाजी भिडेंच्या वक्तव्याबद्दल निवेदन मांडलं.
सभागृहात निवेदन सादर करत असताना देवेंद्र फडणवीसांनी काही वेळा संभाजी भिडेंचा उल्लेख भिडे गुरुजी केला. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले, “आम्हाला ते गुरुजी वाटतात. तुम्हाला काय अडचण आहे? त्यांचं नाव भिडे गुरुजी आहे.” देवेंद्र फडणवीसांच्या सभागृहातील वक्तव्यावरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार हल्लाबोल केला.
सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भास्कर जाधव म्हणाले, “भिडेंनी केलेल्या वक्तव्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. या निवेदनात फडणवीस म्हणाले, अशाप्रकारे राष्ट्रपित्याचा कुणीही अपमान केलेलं आम्ही सहन करणार नाही. दुसऱ्या बाजुला ते म्हणाले, संभाजी भिडे हे आमचे गुरुजी आहेत. याचा अर्थ त्यांनी गुरुजींकडून शिक्षा घेतलीय. गुरुजींनी दिलेला धडा राजकर्ते म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे मान्यच केला आहे. संभाजी भिडे जर त्यांचे गुरुजी असतील तर याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलं की, भिडेंना त्यांनीच बोलायला भाग पाडलं. ते आम्हाला मान्य आहे, असाच त्याचा अर्थ होतो.”
हेही वाचा- “सरकार आणखी किती खोटं बोलणार?” आव्हाडांकडून संभाजी भिडेंबाबतचा थेट पुरावाच सादर, पाहा VIDEO
भास्कर जाधव पुढे म्हणाले, “प्रत्येकवेळी दोन तोंडानं बोलणं, ही भाजपाची फार जुनी नीती आहे. राम मंदिराच्या प्रश्नाबाबत एकाने म्हणायचं न्यायालयाच्या बाजुने निकाल लागू द्या. दुसरीकडे रथयात्रा काढायची. महात्मा गांधींच्या जयंतीदिवशी भाजपाशी संबंधित काही हिंदुत्ववादी विचारांच्या संघटनांनी गांधींच्या फोटोवर गोळीबार करायचा आणि त्यांच्या नेत्यांनी परदेशात जाऊन महात्मा गांधी आमचे राष्ट्रपिता आहेत, असे गोडवे गायचे. एकीकडे कंगना राणौतला खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं, असं म्हणायला लावायचं आणि दुसऱ्या बाजुला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करायचा. ही भारतीय जनता पार्टीची दुतोंडी नीती सुरुवातीपासून आहे.”