शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजासाठी लढणार आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने त्यांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देणार, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केलं होतं. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केलं आहे. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मुख्यमंत्र्यांचा शब्द खरा झाला, तर मला मनापासून आनंदच होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारनं मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लीम समाजाला ६ टक्के आरक्षण दिलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात मराठा आरक्षण गेलं. काँग्रेस-राष्ट्रवादीनं दिलेल्या आरक्षणामुळे काही जणांना सरकारी नोकऱ्या, शिक्षणात राखीव जागा मिळाल्या. पण, मागासवर्गीय समिती नेमली नसल्याचा सांगत न्यायालयानं आरक्षण स्थगित केलं,” असं भास्कर जाधव म्हणाले.

हेही वाचा : “दिल्लीने एकनाथ शिंदेंचं दारातील पायपुसणं केलं, त्यांना वारंवार…”; राऊतांची घणाघाती टीका

“फडणवीसांच्या काळातच मराठा समाजाचं आरक्षण गेलं”

“२०१९ पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाबाबत काहीही हालचाल केली नाही. मराठा समाजाला कोर्ट आणि कचेरीत गुंतवण्याचं काम भाजपानं केलं. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात आरक्षण गेलं नाही. आम्ही टिकावू आरक्षण दिल्याचं भाजपाकडून सांगितलं जातं. पण, फडणवीसांच्या काळातच मराठा समाजाचं आरक्षण गेलं आहे,” असा आरोप भास्कर जाधवांनी केला.

हेही वाचा : अजित पवार यांना बारामती बंदी? मराठा क्रांती मोर्चाची मागणी

“मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा शिंदे फडणवीस करत आहेत”

“उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचं सरकारच टिकणारं आरक्षण देऊ शकत होते. मात्र, दुर्दैवानं सरकार पाडण्यात आलं. आता मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करत आहेत. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मनावर घेत नाहीत, तोपर्यंत एकनाथ शिंदेंनी कितीही शपथा घेतल्या तरी मराठा आरक्षण मिळण्याबाबत माझ्या मनात शंका आहे,” असं भास्कर जाधव म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav on maratha reservation eknath shinde devendra fadnavis ssa