शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर आज हे दोन पक्ष एकत्र आल्याची घोषणा करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी सडकून टीका केली. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आता शिवसेना राहिलीच कुठे… उगीचच शिवशक्ती-भीमशक्ती अशी मोठीमोठी वाक्ये कशाला वापरायची. या राज्यात आणि देशात भीमशक्ती आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्याकडे भीमशक्ती किती आहे? प्रकाश आंबेडकर आणि भीमशक्तीचा काय संबंध,” अशी टीका नारायण राणेंनी केली.
नारायण राणेंच्या टीकेनंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी टोलेबाजी केली आहे. ठाकरे-आंबेडकर युतीवर नारायण राणेंनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता भास्कर जाधव म्हणाले, “नारायण राणे हा शक्तीपात झालेला नेता आहे. स्वत: नारायणराव राणेंच्या तोंडात बळ अन् बाकी सगळं सिताफळ, अशी अवस्था आहे. त्यांना स्वत:ला निवडून येणं अवघड आहे. स्वत:च्या मुलाला निवडून आणता येत नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याची शक्ती राहिली की नाही राहिली, याचं मूल्यमापन त्यांनी करावं म्हणजे हा महाराष्ट्रातला २०२३ मधला सर्वात मोठा विनोद आहे. नारायण राणे स्वत: शक्तीहीन, शक्तीपात झालेले नेते आहेत. तसेच राजकारणात अजिबात महत्त्व न राहिलेले नेते असल्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलण्याची आवश्यकता नाही.,” अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “एकनाथभाऊ हा राजकारणातला नारायण…”; अजब पात्राशी तुलना करत सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी!
दरम्यान, आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषण केली. संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. “जनतेला नको त्या वादात अडकवून, भ्रमात ठेऊनच हुकुमशाही येते. त्याच वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि घटनेचं पावित्र्य जपण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी काय करता येईल या सर्व गोष्टींचा त्या-त्यावेळी विचार करून पुढे जाऊ. मात्र, एक गोष्ट नक्की आहे की, महाराष्ट्रातील तळागाळातील जनतेपर्यंत देशात जे चाललं आहे, ते पोहचवण्याची गरज आहे,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.