शिवसेनेचे ( ठाकरे गट ) नेते भास्कर जाधव यांनी २००४ साली पक्ष सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण, २०१९ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ‘रामराम’ ठोकत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. यावर आता भास्कर जाधव यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. ते ‘झी २४ तास’च्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ कार्यक्रमात बोलत होते.
भास्कर जाधव म्हणाले, “माझ्या आयुष्यात शिवसेना कधी सोडेन असं वाटलं नव्हतं. आज ज्या पद्धतीने शिवसेनेसाठी लढत आहे, पक्षाची बाजू घेऊन उभा आहे. त्यामुळे खरा शिवसैनिक पक्ष सोडेन असं नव्हतं वाटलं. पण, नियतीच्या निर्णयापुढं आपण फिके पडतो. म्हणून मला शिवसेना सोडावी लागली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता. हे आजही आणि उद्याही कबूल करेन. या पक्षातून त्या पक्षात जाणं हे कदापीही चांगलं नाही.”
“एकंदरीत परिस्थिती पाहता राष्ट्रवादी सोडण्यासाठी…”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का सोडला? असं विचारलं असता भास्कर जाधवांनी सांगितल, “त्याबाबत कधीही भाष्य केलं नाही. पक्ष सोडण्यासाठी कोणाला दोष दिला नाही अथवा टीका-टिप्पणी केली नाही. शिवसेना सोडली, तेव्हा एका शब्दानेही टिप्पणी केली नाही. एकंदरीत परिस्थिती पाहता राष्ट्रवादी सोडण्यासाठी सबळ कारण नाही.”
“बंडाखोरांना बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायचं होतं, तर…”
बंडखोर आमदारांनी अनेक कारण सांगितली, आता ते उघडले पडत आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी हरकत घेतली, राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी युती केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त निधी घेतली, अशी तीन कारण सांगण्यात आली. तुम्हाला खरोखरच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायचं होतं, हिंदुत्व पुढे घेऊन जाऊ असं वाटत होतं, तर मंत्रिमंडळात शपथ का घेतली,” असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.