शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून टीकास्त्र सोडताना भास्कर जाधव यांनी शंभूराज देसाईंचा उल्लेख ‘चंबू देसाई’ असा केला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिला आणि शंभूराज देसाईंच्या तोंडाचा ‘चंबू’ झाला, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी टीका केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सीमावादाबाबत प्रश्न विचारला असता भास्कर जाधव म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला लॉक लागलं आहे. तिकडे कर्नाटकचे बोम्मई रोज महाराष्ट्रावर आणि सीमावर्ती भागातील मराठी माणसांवर अन्याय करत आहेत. यावर महाराष्ट्राचं सरकार तोंड उघडत नाहीत. यांच्या दोन मंत्र्यांनी राणा भीमदेवच्या थाटात सांगितलं की, आम्ही कर्नाटकला जाणार आहोत, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच चंद्रकांत पाटील यांच्यासारखा मजबूत मंत्री आणि अन्य एक ‘चंबू देसाई’ त्यांच्या तोंडाचा ‘चंबू’ झाला. सकाळ-संध्याकाळ शिवसेनेवर बोलणारे ‘चंबू’ कर्नाटकच्या बाबतीत ‘चंबू’ झाले,” अशी खोचक टीका भास्कर जाधव यांनी केली.
भास्कर जाधव यांच्या टीकेला शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. २०२४ मध्ये स्वत:ची काय अवस्था होईल, याकडे भास्कर जाधवांनी लक्ष द्यावं, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.
हेही वाचा- “भारत जोडो यात्रा यशस्वी झाली पण… “, राहुल गांधींच्या प्रतिमेबाबत शशी थरूर यांचं विधान
भास्कर जाधवांना प्रत्युत्तर देताना देसाई म्हणाले की, “भास्कर जाधवांकडे सभागृहात बोलण्यासाठी काहीही नाही. त्यामुळे ते प्रसारमाध्यमांसमोर जाऊन बोलतात. सरकारची बाजू मांडणाऱ्या मंत्र्यांवर खालच्या पातळीवर टीका करतात. आम्हालाही भास्कर जाधवांबद्दल बोलता येतं, पण आम्ही बोलत नाही. कारण काहीही झालं तरी आम्ही पूर्वी एकाच पक्षात होतो. आमची काही संस्कृती आहे, एकनाथ शिंदेंनी आम्हाला काही सूचना दिल्या आहेत. ते बोलतच राहतील. पण २०२४ च्या निवडणुकीत त्यांचं काय होईल? याची चिंता त्यांनी करावी,” असा टोला शंभूराज देसाईंनी लगावला.