अयोध्या दौरा काही जणांना खुपला. त्यासाठी विरोधाचा सापळा रचून त्याला राज्यातूनच रसद पुरविण्यात आली. त्यामुळे अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करण्यामागील भूमिका रविवारी स्पष्ट केली. राज ठाकरेंच्या या सभेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया नोंदवल्या जात असतानाच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंच्या या सभेचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांनी राज यांच्या भाषणावरुन त्यांना हिणवण्याऐवजी त्याकडे राजकीय प्रगल्भतेनं पाहिलं पाहिजे असा सल्ला महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि समर्थकांना दिलाय.
राज यांच्या भाषणाने शिवसेनेचे आमदार असणारे जाधव चांगलेच प्रभावित झाल्यांच चित्र दिसत आहे. “राज ठाकरेंच्या भाषणात अनेक अर्थ दडलेले आहेत. कालचं राज ठाकरेंचं भाषण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,” असं भास्कर जाधव म्हणालेत. “किंबहुना राज ठाकरेंनी काल जे भाषण केलं ते राजकीय दृष्ट्या प्रगल्भतेनं तसेच अतिशय वैचारिक पद्धतीने घेण्याची गरज आहे. परिपक्व राजकारणी म्हणून त्या भाषणाकडे बघण्याची आवश्यकता आहे. भाजपाच्या बृजभूषण सिंह या एका खासदाराला तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गप्प करु शकत नव्हते का? हे ते बोलले. महाराष्ट्रातून हे कोणीही आपल्या अंगावर घेण्याची गरज नाही,” असंही भास्कर जाधव म्हणालेत.
“यावरुन (राज ठाकरेंच्या दौरा रद्द करण्याच्या वक्तव्यावरुन) भाजपाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असल्याचं दिसून येतं. भाजपाचं खरं रुप काय, त्यांनी काढलेली नखं राज ठाकरेंनी वेळीच ओळखली. म्हणून मी हे भाषण राजकीय प्रगल्भतेनं घेण्याची गरज आहे. गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असं म्हणतोय,” असंही भास्कर जाधवांनी म्हटलं. “विशेष करुन महाविकास आघाडीच्या सर्वच लोकांना मी विनंती वजा आवाहन करेल की कालचं राज ठाकरेंचं भाषण किंवा त्यांचा रद्द झालेला अयोध्या दौऱ्याच्या मुद्द्याला कुणीही हवा देण्याचं काम करु नये, कुणीही चेष्टेचा विषय करु नये,” असंही भास्कर जाधव यांनी म्हटलंय.
“भाजपा जी बी टीम, सी टीम करत होती. तर त्यातली सी टीम आज भाजपाकडून दूर करण्याच्या दृष्टीने या सभेकडे बघितलं पाहिजे. राज यांना हिणवण्याच्या दृष्टीने बघता कामा नये,” असं मत भास्कर जाधावांनी व्यक्त केलंय. “एमआयएम ही बी टीम आहे. ओवैसींनी सांगितलेलं की राज यांच्या कुठल्याही वक्तव्यावर कोणीही प्रतिक्रिया देऊ नये. याचा अर्थ फार खोल आहे,” असंही भास्कर जाधव यांनी म्हटलंय.