शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली आहे. रामदास कदम यांना अलीकडेच एक मेळावा घ्यायचा होता, पण त्याचा ‘मेलावा’ झाला, अशा शब्दांत भास्कर जाधवांनी खिल्ली उडवली. रामदास कदमांना ना बूड आहे, ना शेंडा आहे, अतिशय बेसलेस नेता म्हणजे रामदास कदम, अशा शब्दात भास्कर जाधवांनी टीकास्त्र सोडलं. ते रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- किरण खरात अपहरण प्रकरण; अर्जुन खोतकरांनीच गुंडांना सुपारी दिली, कैलास गोरंट्याल यांचा गंभीर आरोप

रामदास कदमांच्या नुकत्याच पार पडलेल्या मेळाव्याचा उल्लेख करत भास्कर जाधव म्हणाले, “रामदास कदम हे मेळावा घेणार होते, पण त्याचा ‘मेलावा’ झाला. मेळाव्यासाठी पाच वाजताची वेळ देण्यात आली होती. शेवटी रामदास कदमांना कसंतरी आठ वाजता कार्यक्रमस्थळी यावं लागलं. लोकांनी रामदास कदमांना पूर्णपणे झिडकारलं, नाकारलं असून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली,” अशी टीका भास्कर जाधव यांनी दिली.

हेही वाचा- “अजित पवारांची ‘ती’ इच्छा लवकरच पूर्ण होईल”, शिंदे गटाचे नेते दीपक केसरकरांचं विधान

भास्कर जाधव पुढे म्हणाले, “प्रसारमाध्यमांमध्ये बातमी यावी, म्हणून रामदास कदमांनी पुढचा आमदार शिंदे गटाचे बेटकर असतील, असं सांगितलं. विशेष म्हणजे, यापूर्वी दापोलीला जेव्हा आदित्य ठाकरे आले होते, त्यावेळी मी रामदास कदमांवर सडकून टीका केली. त्यानंतर रामदासभाईंनी ‘उत्तरसभा’ घेतली. त्या सभेच्या वेळी व्यासपीठावर भाजपा नेते केदार साठे बसले होते. तेव्हा रामदास कदम केदार साठेंना म्हणाले नातूंना निरोप द्या… पुढच्या वेळी मी तुम्हाला निवडून आणतो. आता या व्यासपीठावर काय म्हणाले? तर बेटकर तुम्हाला मी निवडून आणतो. खरं तर, रामदास कदमांना ना बूड आहे, ना शेंडा आहे… अतिशय बेसलेस नेता म्हणजे रामदास कदम…” अशा शब्दांत भास्कर जाधवांनी टोलेबाजी केली.

Story img Loader