माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थक आमदारांपैकी एक असणाऱ्या भास्कर जाधवांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भातील पूजा चव्हाण प्रकरणावरुन टोला लगावला आहे. कुडाळ येते कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना चित्रा वाघ यांची नक्कल करत भास्कर जाधव यांनी उपरोधिकपणे संजय राठोड यांना भाजपाने पुन्हा मंत्री केल्याने पूजा चव्हाणला न्याय मिळाला असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “संजय राठोडला मंत्रीपद देणं दुर्दैव, तो मंत्री झाला असला तरी…”; भाजपाच्या चित्रा वाघ मंत्रिमंडळ विस्तार सुरु असतानाच संतापल्या

शंजय राठोड यांना लक्ष्य करताना जाधव यांनी चित्रा वाघ सध्या कुठे आहेत असा खोचक प्रश्न विचारला. “त्या मुलीचा ज्या पद्धतीनं छळ झाला. ज्या पद्धतीनं तिनं आत्महत्या केली. त्या आत्महत्येच्या पाठीमागे संजय राठोडच आहेत अशापद्धतीने भाजपाने महाराष्ट्रात आरोपाची राळ उठवली गेली,” असं जाधव यांनी म्हटलं. पुढे चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरुन पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदांबद्दल बोलताना त्यांची नक्कल जाधव यांनी केली. “त्या भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ रोज सकाळी यायच्या आणि आहो राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब आम्ही तुम्हाला खूप चांगलं मानतो. खूप तुम्हाला चांगलं समजतो. तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. या माऊलीला न्याय द्या. आज चित्रा वाघ कुठं आहेत?” असं जाधव भाषणामध्ये म्हणाले.

तसेच उपरोधिकपणे टीका करताना, “आज त्या माऊलीला न्याय मिळाला असेल. तिच्या आत्म्याला शांती मिळाली असेल कारण चित्राताई वाघ ज्या पक्षाच्या उपाध्यक्ष आहेत त्याच पक्षामुळे संजय राठोडांना मंत्रीमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. आज त्यांच राठोड यांना भाजपाचं सरकार येण्यासाठी सन्मानाने मंत्रिमंडळात घेतलं गेलं आहे. त्यामुळे पूजा चव्हाणला न्याय मिळाला,” असं भास्कर जाधव म्हणाले.

नक्की वाचा >> ४४ हजार २७० कोटींचा मालक आहे शिंदे सरकारमधील ‘हा’ मंत्री; पहिल्यांदाच मंत्रीमंडळामध्ये मिळालं आहे स्थान

“पूजा चव्हाणला न्याय मिळाला. अशी एक नाही अनेक महिने न्याय मिळाला. अनिल देशमुखांसारखा माजी गृहमंत्री गेली १८ महिने तुरुंगात सडतोय. नवाब मलिकांसारखा आमच्या उद्धवसाहेबांच्या मंत्रिमंडळातील मंत्री तुरुंगात सडतोय. काय आरोप लावला त्यांच्यावर १९९३ साली दाऊद इब्राहिमने मुंबईत जे बॉम्बस्फोट घडवले. त्याच्यात हे होते. १९९३ साली बॉम्बस्फोट झाले. तेव्हापासून अनेकदा नवाब मलिक निवडून आले. मंत्री झाले.
केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं. आज आठ वर्ष भाजपाचं केंद्रात सरकार आहे. गेली पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं. तेव्हा ते बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून कधी दिसले नाहीत आणि सापडले नाहीत. पण यांचं सरकार आलं नाही म्हणून त्यांनी हे केलं. अजित पवार परत आले नसते तर पहाटेच्या शपथविधीनंतर हे राष्ट्रवादीसोबत मांडीला मांडी लावून बसले असते तेव्हा यांना मलिक भ्रष्टाचारी वाटले नसते,” असा टोला जाधव यांनी भाजपाला लगावला.