शिवसेनेचा ठाकरे गटाचा दसरा मेळावा सुरु झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या आधी सुषमा अंधारे, अंबादास दानवे, नितीन बानुगडे पाटील यांच्यासह भास्कर जाधव यांचंही भाषण झालं. आपल्या भाषणात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांच्याबरोबर गेलेल्या चाळीस आमदारांवर टीका केली आहे. पुढच्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये आपल्या देशाची आणि राज्याची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत सगळं काही स्पष्ट होईलच असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

काय म्हणाले भास्कर जाधव?

“२०२४ च्या निवडणुकीत जनता शिंदेंना धडा शिकवणार आहे. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना मातीत गाडल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला आपण आलो आहे. ते आपल्याला पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन करतील यात माझ्या मनात शंका नाही” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

भास्कर जाधव यांनी घणाघाती भाषण करत भाजपावर, नरेंद्र मोदींवर आणि एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. भास्कर जाधव यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर टीका केली. गंगाधर फडणवीस-देवेंद्र फडणवीस, अमित शाह-जय शाह, विजयकुमार गावित आणि हिना गावित ही घराणेशाहीच आहे. सोनिया गांधींचं उदाहरण मोदी भाषणात देतात मग त्यांच्याच घराण्यातल्या मनेका गांधी आणि वरुण गांधी यांचं काय? ती घराणेशाही नाही का? असाही प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला आहे. मागच्या दोन निवडणुकीत शिवसेना तुमच्यासोबत होती…आता तुमच्यासोबत नाही…सत्तेत तुम्ही राहणार नाही हे लक्षात ठेवा असंही भास्कर जाधव म्हणाले. ज्यावेळी जवान पुलवामामध्ये जवान शहीद झाले. त्यावेळी पंतप्रधान चित्रीकरणात व्यस्त होते अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली.

Story img Loader