ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. भास्कर जाधव भाजपामध्ये जाणार असल्याचे दावेही करण्यात आले. मात्र, हे सर्व दावे फेटाळून लावत भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच, कोणत्याही पदासाठी किंवा फायद्यासाठी आपण हे करत नसून उद्धव ठाकरेंचं सरकार महाराष्ट्रात पुन्हा आणण्यासाठी आपण हे करत आहोत, असंही ते म्हणाले. मात्र, चिपळूणमध्ये झालेल्या या सभेत भास्कर जाधव यांनी अप्रत्यक्षपणे त्यांची नाराजीही बोलून दाखवल्याचं सांगितलं जात आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव?

दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी भास्कर जाधव हेही बॅग भरून गुवाहाटीला येण्यासाठी तयार होते, आम्ही त्याला विरोध केला, असा दावा केला होता. हा दावा फेटाळून लावताना भास्कर जाधव यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, काही पदांवर हक्क असून असून ती मिळाली नाहीत, तरी कधीही नाराजी बोलून दाखवली नाही, असंही भास्कर जाधव या कार्यक्रमात म्हणाले.

“मी फक्त माझी निवडणूक बघत नाही. आपल्या सहकाऱ्यांच्या निवडणुकांसाठी आपलं पद वगैरे विसरून मी काम करतो. मी माझ्या सहकाऱ्यांना कधी पुढे करून स्वत: मागे उभा राहात नाही. जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा मी स्वत: उभा राहातो. मी कधीही भाड्याचे तट्टू समोर उभे करत नाही”, असं ते म्हणाले.

“…तेव्हा मी उद्धव ठाकरेंना सांगितलं, तुम्ही जर भाजपाबरोबर गेलात तर…”, भास्कर जाधवांनी स्पष्ट केली भूमिका…

“उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मला काहीही मिळणार नाहीये”

“आमचे लोकही म्हणतात की भास्कर जाधवांना उद्या काहीतरी मिळायला हवं म्हणून ते संघर्ष करतात. उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर मला त्यात काहीही मिळणार नाहीये. मी त्यासाठी लढतच नाहीये. ज्याची अपेक्षाच मी केलेली नाही तर ते न मिळाल्याचं दु:ख का होईल मला?” असा प्रश्न भास्कर जाधव यांनी केला.

२०१९ साली मंत्रीपद, २०२२ साली गटनेतेपद…

दरम्यान, भास्कर जाधव यांनी आपली नाराजीच बोलून दाखवल्याचं सांगितलं जात आहे. “२०१९ साली मला मंत्री करायला हवं होतं. सगळ्यात वरीष्ठ मीच होतो. पण मी एकदाही माझ्या भाषणांमध्ये त्याचा उल्लेख केला नाही. मी एकाच मुलाखतीत एकच वाक्य म्हणालो की माझा हक्क होता, मला मिळायला हवं होतं. माझ्यावर अन्याय झाला. पण मी यत्किंचितही नाराज नाही असं स्पष्ट केलं. त्यानंतर कधीही मुद्दा उपस्थित केला नाही”, असं भास्कर जाधव म्हणाले.

“पक्ष फुटला, तेव्हा गटनेता बदलायची वेळ आली होती. विधानसभेत माझा आवाज होता. पण पक्षानं मला गटनेता केलं नाही. पण म्हणून मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही”, असंही त्यांनी नमूद केलं.

Story img Loader