गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कुडाळमधील भाषणावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भास्कर जाधव यांनी आधी राणे कुटुंबीयांवर बेडूक, कोंबडीचोर, चरसी कार्ट अशा शब्दांत टीका केल्यानंतर नितेश राणे यांनीही भटक्या कुत्र्याची उपमा देत भास्कर जाधवांवर टीकास्र सोडलं. दोन्ही बाजूंनी पातळी सोडून टीका होत असताना भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज चिपळूणमध्ये दाखल झालेल्या भास्कर जाधव यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडलं.
भास्कर जाधव यांच्या कुडाळमधील भाषणानंतर रात्री त्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या घराच्या आवारात दगड, काचेच्या बाटल्या, स्टम्प सापडल्यामुळे पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. या पार्श्वभूमवीर चिपळूममध्ये पोहोचलेल्या भास्कर जाधवांनी भाजपाला लक्ष्य केलं. यावेळी बोलताना भास्कर जाधवांना अश्रू अनावर झाले. “माझे सर्व सहकारी अशाच प्रकारे माझ्या पाठिशी उभे राहतात”, असं ते यावेळी म्हणाले.
“माझे सहकारी माझ्या पाठिशी”
“ज्या ज्या वेळेला माझ्यावर आघात होतो, तेव्हा गेल्या ३५-४० वर्षांमध्ये सर्वच सहकारी माझ्या पाठिशी उभे राहतात. नवीन पिढीतले तरुणही माझ्यासोबत आहेत. म्हणून कोणतंही धाडस करताना, निर्णय घेताना मी मनाला विचारतो की आपली भूमिका योग्य आहे की अयोग्य? एकदा मी निर्णय घेतला की त्याच्या दुष्परिणामांची मी परवा करत नाही”, असं जाधव म्हणाले.
“कुवत नसलेल्या लोकांकडून उद्धव ठाकरेंवर टीका”
भाजपातील कुवत नसलेल्या लोकांकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जात असल्याचं भास्कर जाधव यावेळी म्हणाले. “गेल्या अडीच वर्षांपासून भाजपाच्या कुवत नसलेल्या, अधिकार नसलेल्या, ज्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलायलाच नको होतं असे, सुसंस्कृत, सभ्य, पार्टी विथ डिफरन्स असं सांगणाऱ्या पक्षातले खालच्या थरातले कार्यकर्ते उद्धव ठाकरेंवर टीका करत होते. त्याच वेळी माझ्या आतला कार्यकर्ता तळमळत होता. कारण मी बाळासाहेबांची शिवसेना पाहिली आहे”, असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
“जेव्हा शिवसेनेवर, उद्धव ठाकरेंवर आरोप होत होते, तेव्हा आम्हाला अनंत यातना होत होत्या. आमचे ४० सहकारी आम्हाला सोडून गेले आणि या सगळ्याचा कडेलोट झाला. अनेक प्रकारे शिवसेना संपवण्याचा भाजपानं प्रयत्न केला. शिवसेना संपत नाही, हे त्यांच्या लक्षात आलं आणि ४० सहकाऱ्यांना फोडून शेवटी त्यांनी शिवसेनेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिक आतून धुमसतोय. उद्धव ठाकरे त्याला शांत राहा असं सांगतायत”, असंही भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितलं.