शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच दमदाटी केल्यामुळे राज्यभरातून भास्कर जाधव यांच्यावर टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता भास्कर जाधव यांच्या या कृतीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जाधवांचं हे वर्तन अतिशय धक्कादायक असल्याचं फडणवीस म्हणाले आहे.

भास्कर जाधव यांनी आत्मचिंतन करावं. अशा संकटकाळात आपण जनतेचा आक्रोश समजून घ्यायला हवा.  जाधव यांचं हे वर्तन आपल्याला अजिबात योग्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. या वर्तनाची पक्षाने तसंच मुख्यमंत्र्यांनी दखल घेणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. भास्कर जाधव यांच्यावर कारवाई होणार की नाही हा पक्षांतर्गत प्रश्न असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

जाणून घ्या काय आहे प्रकरण- Video : मुख्यमंत्र्यांसमोरच भास्कर जाधवांची पूरग्रस्त महिलेला दमदाटी; जाणून घ्या नक्की काय घडलं

काल चिपळूणच्या पहाणी दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांचं झालेलं नुकसान आणि गाऱ्हाणी ऐकत होते त्यावेळी स्वाती भोजने या त्यांच्या दुकानासमोर उभ्या होत्या. मुख्यमंत्री पहाणी करताना स्वाती यांच्या दुकानासमोर आले तेव्हा स्वाती यांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. “माझं घर गेलं… माझं दुकान गेलं… तुम्ही काहीतरी करा…”, असं म्हणत स्वाती यांनी आपली तक्रार मांडण्यास सुरुवात केली. “तुम्ही काय पण करा… तुम्ही आमदार-खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणासाठी फिरवा… तुम्ही काय पण करा पण मदत करा..”. असं अगदी रडत रडत स्वाती यांनी सांगितलं. यावर मुख्यमंत्र्यांनी मान हलवत होकार देत, “वळवतो… वळतवो..” असं म्हटलं.

मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत असलेले स्थानिक आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अगदी दमदाटीच्या स्वरामध्ये स्वाती यांच्या मुलाला आईला समजवण्यास सांगितलं. आमदार, खासदारांचा दोन महिन्याचा पगार देण्याच्या मागणीवर भाष्य करताना जाधव यांनी, “हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील पण त्याने काय होणार नाही,” असं स्वाती यांना सांगितलं. त्यावर फूल ना फुलाचा पकळी समजून आम्हाला मदत करा अशी मागणी स्वाती यांनी केली. मात्र भास्कर जाधव यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चला म्हणत मुख्यमंत्र्यांसोबतच्या ताफ्यातील लोकांना पुढे जाण्याचा इशारा केला. मात्र त्यानंतर मागे वळून पाहत, “बाकी काय?, तुमचा मुलगा कुठंय” असं भास्कर जाधव यांनी हातवारे करुन विचारलं. त्यानंतर स्वाती यांचा मुलगा दिसताच, “आईला समजव… आईला समजव… उद्या भेट” असं भास्कर जाधव म्हणाले. या भेटीचं आमंत्रणही त्यांनी दमदाटीच्या स्वरातच दिल्याचं पहायला मिळालं.