आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचा विश्वास
राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासारखे आक्रमक नेतृत्त्व लोकांना चालते तर आमच्या भास्कर जाधवांसारखे तरुण आक्रमक नेतृत्व का चालू शकत नाही, आक्रमक नेतृत्त्वाची सवय त्यांनीच तर लोकांना लावली. भास्कर जाधव हे राज, उद्धव यांच्यापेक्षा वरचढ ठरतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन नुकतेच पायउतार होऊन आदिवासी विकास खात्याच्या मंत्रीपदाचा पदभार स्वीकारणारे मधुकर पिचड यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीतील बदलानंतर पिचड प्रथमच आज नगरमध्ये आले. त्यांचा जिल्हा राष्ट्रवादीतर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आदिवास विकास खात्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार उपस्थित होते. तुमची प्रतिमा संयमी प्रदेशाध्यक्ष अशी होती, आता पक्षाला आक्रमक प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे, याकडे लक्ष वेधले असता, पिचड यांनी आम्ही पक्षातील ज्येष्ठ त्यांना कोणत्या वेळी संयमाने वागण्याची आवश्यकता आहे, याची सूचना करु, असे उत्तर दिले.
विवाहातील उधळपट्टीवरुन टीका झालेल्या जाधव यांना प्रदेशाध्यक्ष केल्यामुळे शरद पवार यांची झोप आता कायमची उडेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे, यासंदर्भात बोलताना पिचड यांनी लालकृष्ण अडवाणी आणि नितीशकुमार यांच्यामुळे फडणवीस यांचीही झोप कायमची उडाली असेल, असा टोला लगावला. त्या घटनेनंतर जाधव यांनी माफी मागितली आहे, माफी मागितल्यानंतर त्याला माफ करणे हा सुसंस्कृतपणा आहे, तो सुसंस्कृपणा राष्ट्रवादीने दाखवला आहे, असे पिचड म्हणाले. हिंदुत्त्वाच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष झाला, असाही आक्षेप घेतला जात असल्याकडे लक्ष वेधले असता, ते काही ‘आरएसएस’चे नाहीत, जातीयवादापेक्षा शरद पवार यांचा विचार त्यांना महत्त्वाचा वाटतो, असे सांगून, पिचड यांनी कोकण, मुंबई व ठाणे पट्टय़ातील विधानसभेच्या ७५ जागांकडे लक्ष ठेवून जाधव यांना प्रदेशाध्यक्ष केल्याचे मान्य केले.
आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचार व न्यायालयाने दिलेल्या आदेशासंदर्भात बोलताना पिचड म्हणाले की, न्यायालयात काय प्रतिज्ञापत्र सादर करायचे यासाठी उपमुख्यमंत्री व आपली मंगळवारी बैठक होणार आहे, ६ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप होत असला तरी वस्तुस्थिती तशी आहे का याची चौकशी करावी लागेल, त्यासाठी चौकशी समिती नेमली जाणार आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधात आदिवासी विकास विभागात यंत्रणा उभी करावी लागणार आहे.