नांदेड : काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे आणखी एक पक्षांतर अखेर ठरलं आहे. ह्यांच्यासाठी महायुतीतील दोन पक्षांमध्ये रस्सीखेच झाल्यानंतर खतगावकर यांनी आपल्या उर्वरित कारकिर्दीसाठी तसेच सूनबाईंच्या राजकीय भविष्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची ‘घडी’ निश्चित केली आहे. वरील पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुढील आठवड्यात (दि.२८) नांदेडमध्ये येत असून त्यांच्या उपस्थितीत होणा-या जाहीर कार्यक्रमात खतगावकरांसह त्यांच्या स्नुषा डाॅ. मीनल पाटील आणि त्यांचे समर्थक नव्या पक्षाशी गाठ बांधणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही आठवड्यांपासून खतगावकरांच्या पक्षांतराची चर्चा येथे सुरु होती. ‘राष्ट्रवादी’चे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खतगावकर व त्यांच्या गटाला आपल्या पक्षात आणण्याची नेपथ्यरचना केल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील काहींनी खतगावकर यांना आपल्या पक्षात घेण्याचा ‘अंक’ उभा केला होता. या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या अलीकडच्या नांदेड दौ-यात हा अंक अंतिम होणार असे मानले जात असताना पक्षाच्या एका स्थानिक आमदाराने त्यात अडथळा आणल्यामुळे शिंदे – खतगावकर यांनी संभाव्य भेट रद्द झाली होती.
या निमित्ताने महायुतीतील दोन पक्षांमधली रस्सीखेच समोर आल्यानंतर खतगावकरांच्या राजकीय निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर खतगावकर यांनी ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांची मुंबईमध्ये भेट घेऊन चर्चा केल्यानंतर त्यांचा नवा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी खतगावकर आणि त्यांच्या सूनबाईंनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला हाेता. या पक्षाने डाॅ. मीनल पाटील यांना नायगाव मतदारसंघात उमेदवारी दिली; पण तेथील प्रभावशाली गटाच्या असहकारामुळे मीनल पाटील यांचा पराभव झाल्यामुळे खतगावकर नव्या राजकीय पर्यायाच्या शोधात होते.खतगावकर यांना मानणारे माजी आमदार अविनाश घाटे, व्यंकटराव गोजेगावकर, शिवराज पाटील होटाळकर प्रभृती आधीच ‘राष्ट्रवादी’त दाखल झालेले आहेत. आता खतगावकरांसह ओमप्रकाश पोकर्णा, मोहन हंबर्डे या माजी आमदारांना ‘राष्ट्रवादी’च्या वाटेवर आणत आ. चिखलीकर यांनी भाजपा नेते अशोक चव्हाण यांना शह दिला आहे.