नांदेड : जिल्ह्याच्या राजकारणातील गेल्या २० वर्षांतला सर्वांत मोठा आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा येत्या रविवारी (दि.२३) नरसी येथे होणार असून ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर हे या सोहळ्याचे कर्तेधर्ते आहेत. खतगावकर आणि त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारात आणण्यामध्ये पुढाकार घेतानाच आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपा नेते खा.अशोक चव्हाण यांना मोठा शह दिल्याचे मानले जात आहे.

गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जिल्ह्यातील सर्व ९ जागा जिंकल्या. त्यांतील ५ जागा भाजपाच्या तर ३ जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या; पण मागील काही महिन्यांत पक्षविस्ताराच्या बाबतीत महायुतीतील चिखलीकरांच्या रुपाने एकच आमदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरचढ ठरल्याचे दिसत आहे. रविवारच्या प्रवेश सोहळ्यानंतर ‘राष्ट्रवादी’त दाखल होणार्‍या माजी आमदारांची संख्या चार होईल. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांचे माजी पदाधिकारी, गावोगावचे सरपंच व इतर प्रमुख कार्यकर्तेही भाजपाऐवजी ‘राष्ट्रवादी’त जाणे पसंत करत आहेत.

नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात लक्षवेधी पक्षांतर २०१४ साली झाले होते. खतगावकर यांनी तेव्हा भाजपा प्रवेशाची सुरुवात केल्यानंतर अनेक प्रमुख नेत्यांनी भाजपाची वाट धरली; पण अनेक सहकारी सोडून गेले, तरी पुढील काळात अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचे अव्वलस्थान कायम राखले होते. २०१४ सालच्या पक्षांतराच्या लाटेत नांदेड जिल्ह्यात एकाही मोठ्या पक्षप्रवेश सोहळ्याची नोंद झाली नव्हती. खुद्द अशोक चव्हाण यांनी गतवर्षी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, तरी या पक्षाच्या नेत्यांना नांदेडमध्ये आणून मोठा सोहळा त्यांनी टाळला होता. भाजपात प्रवेश केल्यावर अनेक महिने त्यांचा पवित्रा बचावात्मकच राहिला. त्यांचे अनेक समर्थक गटागटाने भाजपावासी झाल्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाची ठळक नोंद झालीच नाही.

या पार्श्वभूमीवर आ.चिखलीकर यांनी आपल्या पक्षाचा विस्तार करताना, माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्या पक्षप्रवेशानिमित्त गेल्या महिन्यांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लक्षवेधी प्रवेश सोहळा घडवून आणल्यानंतर त्याचदिवशी खतगावकर आणि त्यांच्या समर्थकांचा ‘राष्ट्रवादी’तील प्रवेश निश्चित झाला होता. नंतर पवार यांनी या कार्यक्रमाकरिता २३ तारीख देताच वयाची ८० वर्षे पार केलेले भास्करराव मागील आठवड्यापासून सक्रिय झाल्याचे दिसून आले. आपल्या प्रभावक्षेत्रांत तालुकानिहाय बैठका घेऊन समर्थकांना नव्या राजकीय प्रवासात आणण्याचा त्यांचा धडाका त्यांतून समोर आला.

नरसी-शंकरनगर ते देगलूर आणि दुसर्‍या बाजूला बिलोली-कुंडलवाडी ते धर्माबाद इत्यादी भागांत खतगावकरांचे समर्थक पसरले असून त्यांतील बहुसंख्यकांना एकत्र आणून ते रविवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. जिल्ह्यातील मुस्लीम व इतर अल्पसंख्याकांत खतगावकर यांचा चांगला संपर्क असल्यामुळे आतापर्यंत काँग्रेससोबत टिकून असलेला मुस्लीम समुदाय पुढील काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागण्याची शक्यता दिसत आहे.

नरसी येथील पक्षप्रवेश सोहळा पार पडल्यानंतर अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अन्य नेते नांदेड शहरात येणार असून विमानतळाजवळच्या एका हॉटेलमध्ये नांदेड व लगतच्या तीन जिल्ह्यांतील पदाधिकार्‍यांची बैठक ठेवण्यात आली आहे. ही बैठक झाल्यानंतर पवार आणि अन्य नेते देगलूर नाका भागातील एका मोठ्या इफ्तार पार्टीला हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात आले. तीन आठवड्यांच्या अंतराने पवार दुसर्‍यांदा नांदेडला येत असून जिल्ह्यातील पक्षवाढीकडे त्यांनी स्वतः लक्ष घातल्याचे दिसत आहे.

तो सर्वात मोठा पक्षप्रवेश सोहळा…

नांदेड जिल्ह्यात मागील काळात म्हणजे जानेवारी २००२ मध्ये दिवंगत गंगाधरराव कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या गटाने ‘राष्ट्रवादी’चे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत या पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्या दशकांतील तो सर्वात मोठा पक्षप्रवेश सोहळा ठरला. त्यानंतर खतगावकर व त्यांच्या समर्थकांनी त्याहून मोठ्या प्रवेश सोहळ्याचे लक्ष्य निर्धारित केले असून त्या दिशेने संपूर्ण तयारी केली जात आहे.

Story img Loader