नांदेड : मागील काही वर्षांपासून कारखाना अंतर्गत आणि बाह्य कटकटींना निमूटपणे तोंड देत भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळणारे गणपतराव श्यामराव तिडके यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा कारखान्याच्या उपाध्यक्षांकडे सादर केला. या माहितीला साखर सह संचालक कार्यालयाकडून दुजोरा मिळाला आहे.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि आता भाजपामध्ये असलेले खासदार अशोक चव्हाण यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन लाभलेल्या वरील कारखान्यात मागील अनेक वर्षांपासून गणपतराव तिडके हे अध्यक्षपद भूषवत होते. गुरूवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती कारखाना प्रशासनातून बाहेर आली आणि मग वेगवेगळ्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्षेत्रात पसरली.
या पार्श्वभूमीवर चौकशी केली असता प्रकृती साथ देत नसल्यामुळे प्रशासकीय कामकाजात भाग घेता येत नाही, असे कारण नमूद करून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा कारखान्याचे उपाध्यक्ष नरेन्द्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केल्याचे स्पष्ट झाले. राजीनामा पत्राची प्रत राज्याचे साखर आयुक्त, प्रादेशिक सह संचालक (साखर कार्यालय) आणि अशोक चव्हाण यांना इ-माध्यमाद्वारे पाठविण्यात आलेली आहे.
१९९०च्या दशकात अर्धापूर तालुक्यातील देगाव-येळेगाव परिसरात भाऊराव चव्हाण कारखान्याची स्थापना झाली. नंतर या कारखान्याचे अध्यक्षपद निवृत्त पोलीस अधिकारी मोहनराव पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांच्यानंतर अध्यक्षपदाची धुरा गणपतराव तिडके यांच्याकडे आली. पंधरा वर्षांहून अधिक काळ त्यांनी कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळले.
भाऊराव चव्हाण कारखान्याने आपल्या मूळ प्रकल्पाच्या माध्यमातून डोंगरकडा कारखान्यासह वाघलवाडा येथील शंकर आणि हदगाव येथील हुतात्मा जयंतराव पाटील असे तीन कारखाने तिडके यांच्या अध्यक्षपदाच्या काळात खरेदी केले. पण चार कारखान्यांचा भार पेलता पेलता अनेक अडचणी उद्भवल्यानंतर मधल्या काळात दोन कारखान्यांची विक्री करण्यात आली. या सबंध काळात तिडके यांना कारखान्याअंतर्गत बर्याच कटकटींना तोंड द्यावे लागले. पण आपल्या शांत स्वभावाला साजेल अशा पद्धतीने त्यांनी आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावर मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर टीका झाली. शेतकरी नेत्यांकडून कारखान्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले. एफआरपीच्या मुद्यावर अर्धापूर तालुक्यातील प्रल्हाद इंगोले व इतर कार्यकर्त्यांनी भाऊराव चव्हाणच्या प्रशासनाला न्यायालयामध्येही खेचले होते. अनेक प्रकरणे आजही न्यायालयात प्रलंबित आहेत.
मधल्या काळात कारखान्याच्या नेतृत्वाने प्रशासनामध्ये लातूर जिल्ह्यातील एका अधिकार्याला आणून गणपतराव तिडके यांची कोंडी केली होती. वरील अधिकार्याच्या कारकिर्दीत तिडके हे केवळ नामधारी अध्यक्ष बनले होते. पण त्याबद्दल कोठेही वाच्यता न करता त्यांनी निर्माण झालेल्या परिस्थितीला शांतपणे तोंड दिले. काही वर्षांपूर्वी त्यांना एका विकाराने ग्रासले, तरी अवघड स्थितीतही त्यांनी कारखान्याचा कारभार रेटून नेला. पण आता त्यांनी जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त बाहेर येताच समाजमाध्यमांमध्ये त्यावर चर्चा सुरू झाली.