वर्षभरापूर्वी शिवेसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदार खासदारांसह वेगळा गट बनवला आहे. या गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. त्याचबरोबर पक्षाचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे. पक्षात फूट पडल्यानंतर गेल्या वर्षभरापासून शिवसेनेच्या ठाकरे गटातून नेत्यांची गळती सुरू आहे. सातत्याने ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. अलिकडेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज (२३ ऑगस्ट) ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. वाकचौरे यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्तेही ठाकरे गटात सामील झाले आहेत.
भाऊसाहेब वाकचौरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. यावेळी खासदार विनायक राऊत आणि ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या ‘मतोश्री’ या निवासस्थानी वाकचौरे यांनी हाती शिवबंधन बांधलं. यावेळी वाकचौरे यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वाकचौरे हे काँग्रेस, भाजप असा प्रवास करून पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतले आहेत.
भाऊसाहेब वाकचौरे हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर शिर्डीतून खासदार झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकीटावर शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढले. परंतु त्यावेळी शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांनी वाकचौरे यांचा दोन लाख मतांनी पराभव केला होता. आता वाकचौरे यांची घरवापसी झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभेला भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरे गटाच्या तिकीटावर पुन्हा एकदा शिर्डीतून निवडणूक लढतील असं बोललं जात आहे.
हे ही वाचा >> “भाजपाची बी टीम तयार, रावसाहेब दानवेंची कबुली”, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत काँग्रेसची टीका…
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे माजी नगरसेवक संजय छल्लारे, सुधीर वायखिडे यांनीदेखील आज त्यांच्या समर्थकांसह मातोश्री येथे ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं.