तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या व सिंचनाचे प्रश्न सोडविणाऱ्या दारणा नदीच्या उगमस्थानी असलेले भावली धरण ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली आहे. दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे भावली धरण शनिवारी दुपारनंतर काठोकाठ भरून ओसंडून वाहू लागले. पावसामुळे तालुक्यातील भावली, दारणा, कडवा व वाकी या धरणांच्या साठय़ात समाधानकारक वाढ झाली आहे. दारणा धरणातून आजपर्यंत ४० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग झाल्याची माहिती अभियंता एस. के. मिसाळ यांनी दिली. पावसामुळे काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून शेतीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. पावसामुळे दारणा, भाम, भावली, वाकी, कडवा या नद्यांना बऱ्यापैकी पाणी आले आहे. आतापर्यंत तालुक्यात १५४३ मिमी पाऊस झाला आहे. दारणा नदीच्या उगमस्थानी बांधण्यात आलेल्या भावली धरणातील पाणी पुढे दारणा धरणाला जाऊन मिळते. संपूर्ण तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची मदार या धरणावर आहे. यामुळे मागील काही महिन्यांत या धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग झाल्याने धरणाने तळ गाठला होता. दारणा नदीलगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याची सिंचनाची भिस्त या धरणावर असल्याने सर्व जण भावली धरण भरण्याच्या प्रतीक्षेत होते. भावली धरण परिसर पर्यटकांचे आकर्षण झाला असून धरण भरल्याने पर्यटकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

Story img Loader