शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्यात आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना शिंदे गटावर सडकून टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी खासदार भावना गवळी यांनाही लक्ष केलं. आपल्या पलिकडच्या ताईंना धमक्या मिळाल्यानंतर त्यांनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या आरोपाला भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेल्या भावना गवळी यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – “मी राज्यपालांचा आगाऊपणा…” काळ्या टोपीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं कोश्यारींवर टीकास्र!
काय म्हणाल्या भावना गवळी?
“मी यापूर्वीही माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी पंतप्रधान मोदींना आज नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून राखी बांधते आहे. त्यामुळे यावरून कोणीही राजकारण करू नये. हे मी यापूर्वीही सांगितलं आहे. पंतप्रधान मोदींप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही मी दरवर्षी राखी पाठवते”, अशी प्रतिक्रिया खासदार भावना गवळी यांनी दिली आहे.
“माझ्यावर जे आरोप करण्यात आले होते, त्या प्रकरणी मला न्यायालयातून दिलासा मिळाला आहे. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. संजय राऊतांनाही न्यायालयानेच दिलासा दिला आहे. त्यामुळे कोणीही न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढू नये”, असे प्रत्युत्तरही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले.
हेही वाचा – शिंदे गट भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार? उद्धव ठाकरेंच्या टीकेला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
दरम्यान, बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी भावना गवळींवर पंतप्रधानांना राखी बांधण्यावरून टीका केली होती. “आपल्या पलिकडच्या ताई तुम्हाला माहिती आहेत. शिवसेनेने त्यांना अनेकदा खासदार केलं. मात्र, या ताईंना धमक्या देण्यात आल्या. मुंबईहून इकडे दलाल पाठवण्यात आले. त्यांच्या चेलेचपाट्यांना अटक झाली, पण ताई मोठ्या हुशार निघाल्या. ताईंनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली. तो राखी बांधल्याचा फोटो छापून आणला आणि मग तो फोटो छापून आल्यावर ताईंवर कारवाई करण्याची ईडी-सीबीआयवाल्यांमध्ये हिंमत आहे का? त्या तिकडे गेल्यावर त्यांना सर्व आरोपांपासून संरक्षण मिळालं”, असे ते म्हणाले होते.