शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील सभेत खासदार भावना गवळी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडी थांबली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भावना गवळींना लक्ष्य केलं होतं. याला भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांना नात्यातील महत्व कळत नाही, असं टीकास्र भावना गवळींनी सोडलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“गेल्या वर्षीचं रक्षाबंधन तुम्हाला आठवतं का? पंतप्रधानांना राखी बांधतानाचा एकच फोटो आला होता. पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडीची चौकशी थांबली,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
“उद्धव ठाकरे यांना नात्याचं महत्वं कळत नाही”
यावर बोलताना भावना गवळी म्हणाल्या, “उद्धव ठाकरे यांनी पवित्र नात्यावर सतत वक्तव्य केलं आहे. कदाचित उद्धव ठाकरे यांना नात्याचं महत्वं कळत नसेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं भांडणंही कधीच संपलं असतं. पण, उद्धव ठाकरेंनी त्यावर निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीसांबरोबरही उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली.”
“उद्धव ठाकरेंनी कोणाला चांगली वागणूक दिली नाही”
“उद्धव ठाकरे यांना कधी नातं टिकवता आलं नाही. म्हणून ते सतत पवित्र बंधनावर बोलत असतात. उद्धव ठाकरे यांनी कधीही कोणाला चांगली वागणूक दिली नाही. ४० आमदार आणि १३ खासदार सोडून का गेले? यांचं चिंतन उद्धव ठाकरे यांनी केलं नाही,” असं टीका भावना गवळी यांनी केली.
हेही वाचा : “दाढीवाल्याने भाजपाची पावडर लावली”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटातील नेते प्रत्युत्तर देत म्हणाले…
“…म्हणून या बंधनावर उद्धव ठाकरे यांनी बोलू नये”
“मी पाचवेळा खासदार म्हणून निवडून आली. माझ्या मतदारसंघात २४ वर्षापासून रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबवत आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांना राखी बांधली आहे. पंतप्रधान मोदींनाही राखी बांधत आहे. त्यामुळे या बंधनावर उद्धव ठाकरे यांनी बोलू नये. उद्धव ठाकरे यांनी कधीही बंधन पाळलं नाही. म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा हल्लाबोल भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.