तुळजापूर:  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात गुरूवारी आठव्या माळेला तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. देवीच्या या रूपाचे दिवसभरात लाखो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुळजाभवानी देवीची गुरूवारी आठवी माळ होती. सकाळी नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजा झाल्यानंतर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन शिवरायांना आशीर्वाद दिला. त्याची अनुभूती घडविणारी अलंकार पूजा देवीसमोर मांडण्यात आली होती. दरम्यान बुधवार ९ ऑक्टोबर रोजी सातव्या माळेला रात्री देवीच्या उत्सव मूर्तीची छबिना मिरवणूक गरुड वाहनावरुन काढण्यात आली. 

हेही वाचा >>>रत्नागिरी विधानसभेसाठी शिवसेनाच्या उमेदवारांचे काम न करण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा बैठकीत निर्णय, पक्ष बदलण्याचा निर्णय

शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी नवव्या माळेला तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. तसेच सकाळी ७ वाजता होमहवनास आरंभ होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.१५ वाजता पुर्णाहुती देण्यात येणार आहे. शनिवारी नवरात्रातील दहाव्या माळेला महानवमी व दुपारी होमावर धार्मिक विधी करून घटोत्थापन व रात्री नगरहून येणार्‍या पलंग पालखींची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर रविवारी पहाटे देवीची सिमोल्लंघन पार पडल्यानंतर नवरात्रानंतर रात्री मंचकी निद्रा सुरू होणार आहे. पुढील पाच दिवस म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या उत्तरार्धापर्यंत देवीची ही निद्रा सुरू राहणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी पुन्हा देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करून मंदिर पौर्णिमा साजरी होणार आहे. या दिवशी देवीची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य व त्यानंतर सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह आरती व रात्री छबिना व जोगवा मागून या नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhavani talwar alankar mahapuja in navratri festival of aai tuljabhavani devi tuljapur amy