यवतमाळ-लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये केवळ पुसदचा एक अपवाद वगळता उर्वरित कारंजा, वाशीम, राळेगाव, यवतमाळ आणि दिग्रस या पाचही मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या भावना गवळी यांनी कांॅग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना मागे टाकून आघाडी घेऊन विजय संपादन केला.
भावना गवळी यांना वाशीम मतदारसंघात ८८ हजार ९९०, कारंजात ६४ हजार ८८९, राळेगावात ८३ हजार २६८, यवतमाळात ८७ हजार ५४४, दिग्रसमध्ये ९४ हजार ४६९ आणि पुसदमध्ये ५७ हजार ७७० मते मिळाली, तर शिवाजीराव मोघे यांना वाशीममध्ये ६० हजार ९६२, कारंजात ६० हजार ९२७, राळेगावात ६५ हजार २१३, यवतमाळात ५९ हजार १५६ आणि दिग्रसमध्ये ६७ हजार ३७० मते मिळाली. पुसद या एकाच मतदारसंघात मोघे यांनी गवळीपेक्षा आघाडी घेतली. गवळींना पुसदमध्ये ५७ हजार ७७०, तर मोघेंना ७९ हजार ०११ मते मिळाली. मोघे यांचा जवळपास ९४ हजार मतांनी भावना गवळींनी पराभव करून चौथ्यांदा लोकसभेत प्रवेश केला आहे.
या मतदारसंघात तब्बल २६ उमेदवार उभे होते. त्यात प्रामुख्याने विजयाची खात्री सांगणारे माजी खासदार जांबुवंतराव धोटे (फारवर्ड ब्लाक) यांना फक्त ४७०८ मते मिळाली. त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. यापूर्वी दोनदा नागपूरमधून खासदार राहिलेले मात्र यवतमाळातून तीनदा खासदारकी हरलेल्या धोटेंनी दोनदा अनामत रक्कम गमावल्याचा अनुभव घेतला आहे. यावेळी हा त्यांचा तिसरा अनुभव आहे. या मतदारसंघातील मनसे, सपा, बसपा, बहुजन मुक्ती पार्टी, आम आदमी पार्टी, भारिप-बहुजन महासंघ, सी.पी.एम, वेलफेअर पार्टी, खोब्रागडे आरपीआय, आंबेडकरकरिष्ठ रिपाई, प्रबुध्द रिपब्लिकन पार्टी या पक्षांसह ११ अशा एकूण २४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. मोघे-गवळी वगळता एकाही उमेदवाराला ६० हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही. भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे पती कॅप्टन प्रशांत सुर्वे यांना १५५८, तर अपक्ष उपेंद्र पाटलांना ८९५, मनसेच्या राजू पाटलांना २६ हजार १९४, तर बसपाच्या बळीराम राठोड यांना ४८ हजार ९८१ मते मिळाली.