Bhayyaji Joshi Controversy over Marathi Row : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते व माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्याचे राज्याच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. यादरम्यान भय्याजी जोशी यांनी त्यांच्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिले असून त्यांच्या वक्तव्याबद्दल गैरसमज झाल्याची भावना व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी आपण देखील मराठी भाषिक असल्याचे स्पष्ट केले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भय्याजी जोशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “मुंबईतील उपनगर घाटकोपर येथे काल एका कार्यक्रमात मी केलेल्या एका वक्तव्याबद्दल गैरसमज झाला आहे असे मला वाटते. हा प्रश्नच उपस्थित होत नाही की मुंबईची भाषा मराठी आहे की नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, मुंबई महाराष्ट्रात आहे आणि स्वाभाविकपणे मुंबईची भाषा मराठी आहे”.

“भारतात अशा वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, भारत यासाठी विशेष आहे. मुंबईत देखील विविध भाषिक लोक राहतात. त्यामुळे अपेक्षा असते की त्यांनी देखील येथे येऊन मराठी शिकावी, मराठी समजून घ्यावी, मराठी शिकावी. याचा आग्रह राहिलाच पाहिजे. कारण प्रत्येक राज्याची ही वेगळी ओळख आहे. हे एक सह-अस्तित्वाचे खूप मोठे उदाहरण आहे की, भारतात इतक्या विविध भाषा बोलणारे लोक एकत्र राहून परस्पर सहयोग करतात. मला वाटते की मुंबई देखील याचे आदर्श उदाहरण आहे,” असेही भय्याजी जोशी यावेळी म्हणाले.

मी स्वतः मराठी….

“मी स्वत: मराठी भाषिक आहे. माझी मातृभाषा मराठी आहे. मराठीबद्दलचा स्वाभिमान मा‍झ्या मनात देखील आहे. पण मी सर्व भाषांच्या अस्तित्वाचा देखील सन्मान करतो. संपूर्ण जगात देखील भारताने एक वेगळे उदाहरण सादर केले आहे. आपण त्याकडे त्याच नजरेने पाहावे अशी माझी सर्वांना विनंती आहे,” असेही जोशी म्हणाले.

भय्याजी जोशी काय म्हणाले होते?

“मुंबईची कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही”, असे विधान मुंबतील विद्याविहार येथे भाषण करताना भय्याजी जोशी यांनी केले होते.

Story img Loader