अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. कारण त्यांचा विश्वासू सेवक विनायक दुधाळे पोलिसांना शरण आला आहे. पोलीस त्याची या प्रकरणी चौकशी करत आहेत. आपण जाणून घेऊया कोण आहे विनायक दुधाळे.
विनायक दुधाळे हा भय्यू महाराजांचा अत्यंत विश्वासू सेवक होता. भय्यूजी महाराज हे विनायकला घरातल्या सदस्याएवढेच महत्त्वाचे मानत होते. भय्यूजी महाराजांनी त्यांच्या संपत्तीचे सर्वाधिकार विनायककडे दिले होते. आत्महत्येच्या वेळी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्येही त्यांनी हा उल्लेख केला होता. ” विनायक माझा विश्वासार्ह आहे. विनायक माझ्या अर्थ, मालमत्ता आणि बँक खात्यांची सगळी जबाबदारी घेईल, हे कोणत्याही दबावाखाली लिहिलेले नाही.” असे सुसाइड नोटमध्ये म्हटले गेले आहे.
विनायक हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. इंदूरमध्ये तो राहात असताना तिथल्या स्थानिकांच्या मदतीने तो भय्यू महाराजांच्या संपर्कात आला. काही दिवसातच त्याने भय्यूजी महाराजांचा विश्वास जिंकला. त्याच्यावर भय्यू महाराजांचा इतका विश्वास होता की त्यांनी त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या विनायककडे सोपवल्या. भय्यूजी महाराज यांच्या आयुष्याशी निगडीत गोष्टी विनायकला ठाऊक होत्या. ज्यावेळी भय्यू महाराजांनी आत्महत्या केली तेव्हाही विनायक घरीच होता. त्याचमुळे त्याला या आत्महत्येबाबत काय ठाऊक आहे? यामागे काय कारण असू शकते याचा शोध आता पोलीस घेत आहेत.