वाई : महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींवर मात करुन स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षण देण्याचे महान कार्य केले.त्यामुळे महिला शक्ती आज सर्व क्षेत्रात पुढे येत आहे. त्यामागे त्यांचीच प्रेरणा आहे. पुणे येथील भिडे वाडा येथे स्मारक उभारणीबाबत सर्वबाबींची पुर्तता करुन दोन महिन्यात स्मारकाचे भूमिपूजन केले जाईल. या स्मारकाच्या माध्यमातून अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (ता खंडाळा)येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, सहकार व इतर मागास बहुजन कल्याण  मंत्री अतुल सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार  छगन भुजबळ,महादेव जानकर, मकरंद पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> रोहित पवारांकडून अजित पवारांच्या विधानाचं समर्थन; ‘त्या’ वक्तव्यांचा उल्लेख करत भाजपावर टीकास्त्र

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव तर कर्मभूमी पुणे असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले , त्यांना घडविण्यात नायगावचा मोठा वाटा आहे. त्यांचा वाडा हा ऐतिहासिक ठेवा आहे. फुले दांपत्यामुळे आज महिला विविध क्षेत्रात काम करत आहेत.स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी  सुरू केलेला स्त्री सक्षमीकरणाचा जागर जगाला आदर्शवत आहे. त्यांच्या कार्यामुळे राज्य आणि देशातील स्त्री शक्ती आज विविध क्षेत्रात पुढे येत आहे. आज राष्ट्रपती पदावरही महिला विराजमान आहेत.

त्यांची  प्रेरणा घेऊनच राज्य शासन काम करीत आहे. इतर मागास प्रवर्गातील मुले व मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहे उभारण्यात येणार आहेत. महात्मा फुले यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटासंबंधी असलेल्या अडचणी दूर करून त्यांचे कार्य सर्वांसमोर ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

हेही वाचा >>> “आशिष शेलार शंकराचार्य आहेत का देशाचे? हिंदुत्वावर बोलण्याचा त्यांना…” संजय राऊतांचा पलटवार!

महिला सक्षमीकरणासाठी प्रशासन काम करीत असून, राज्यभरात दोन हजार ८०० बचत गटांची निर्मिती करण्यात येणार आहे.  करोना संसर्गात कर्त्या पुरुषांचे निधन झाले.  त्यांच्या पाल्यांसाठी ‘मिशन वात्सल्य’ योजना सुरु करण्यात आली आहे.  खंडाळा तालुक्यातील १४ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्याबरोबर नायगांव ते मांढरदेव रस्ताही पूर्ण केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. यावेळी शंभूराज देसाई, अतुल सावे, छगन भुजबळ, रूपालीताई चाकणकर आदींची भाषणे झाली. सरपंच साधना नेवसे यांनी प्रास्ताविक केले. नितीन भरगुडे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhide wada national monument construction work in pune will start in two months cm eknath shinde zws
Show comments