आरक्षणासाठी मोर्चे काढून ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाज आदिवासी नेत्यांचे पुतळे जाळत असून हे राजकीय षडयंत्र आहे. आमच्या नेत्यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी गांगुर्डे यांनी आज राहाता येथे दिला.
धनगर समाजाला आरक्षण देऊ नये व अन्य मागण्यांसाठी आदिवासी संग्राम परिषदेचे नेते दशरथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी राहाता नगरपरिषद व राहाता तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी सुखदेव गायकवाड, कैलास माळी, रेवणनाथ जाधव, भाऊराव माळी, डॉ. प्रदीप मोरे यांच्यासह आदिवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मोर्चात महिलाही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.
गांगुर्डे म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणप्रश्नी मोर्च काढून आमच्या नेत्यांचे पुतळे जाळण्याचे प्रकार त्वरित थांबावा. अन्यथा आदिवासी जनता जशाच तसे उत्तर देईल. सरकारने धनगर समाजाला आदिवासींच्या हक्काचा वाटा दिल्यास हे आम्ही खपवून घेणार नाही. दशरथ गायकवाड म्हणाले, सरकार स्वातंत्र्यापासून आदिवासींना खेळवत आहे. बेघर आदिवासींना जमीन व घर द्या ही मागणी पूर्ण करायला सरकारला वेळ नाही. आदिवासीच उपेक्षित असताना धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करणे अन्यायकारक असून यास आमचा विरोध आहे.
आधी राहाता नगरपालिकेवर नेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सुखदेव गायकवाड यांनी नगराध्यक्ष लता मेहेत्रे यांना दिले. मोर्चा राहाता तहसील कार्यालयावर नेऊन आरक्षण विरोध व इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

Story img Loader