Bhim Army : बीडच्या मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. यानंतर या प्रकरणात तीन आरोपींना अटक झाली. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे अशा चर्चा रंगल्या. विरोधकांनीही याच अनुषंगाने वाल्मिक कराड कुठे आहे असा प्रश्न उपस्थित केला. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांचा उल्लेख आका असा केला होता. दरम्यान आज वाल्मिक कराड यांनी सीआयडीसमोर शरणागती पत्करली त्यानंतर त्यांना बीडच्या केजमध्ये नेण्यात आलं. यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत अशात वाल्मिक कराडचा एन्काऊंटर झालाच पाहिजे अशी एक मागणी समोर आली आहे.

वाल्मिक कराड यांनी व्हिडीओ पोस्ट करत काय म्हटलं आहे?

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात आरोप केले जात असून जर पोलिस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचे ते म्हणाले आहेत. वाल्मिक कराड शरण आल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत भाष्य केलं. विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे त्याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : ‘धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का?’ प्रश्न विचारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमची भूमिका…”

भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी काय म्हटलं आहे?

अन्याय अत्याचार होऊच नये ही आमची भीम आर्मी म्हणून भूमिका असते. तसंच ज्या ठिकाणी अशी एखादी घटना घडते तिथे आम्ही भीम आर्मी म्हणून पीडितांना न्याय मिळवून देतो. चंद्रशेखर आझाद या व्यवस्थेच्या विरोधात लढत आहेत. मी त्यांच्याशी मस्साजोगचा विषय बोललो. मस्साजोगचा विषय हा देशाचा आहे, त्यामुळे हा विषय संसदेत मांडण्यासाठी चंद्रशेखर आझाद प्रयत्न करणार आहेत. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्रात ही घटना घडली आहे. जनतेने हे आंदोलन हातात घेतलं आहे असं भीम आर्मीचे अशोक कांबळेंनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर झालाच पाहिजे असंही म्हटलं आहे.

वाल्मिक कराड कुठे आहे हे बीडची जनताच विचारत होती-कांबळे

वाल्मिक कराड लपला कुठे आहे? असा प्रश्न बीडची जनता विचारत होती. सोमवारी पोलिसांच्या ५० ते ६० गाड्या बीडमध्ये फिरत होत्या. कालच कशासाठी फिरत होत्या? तर आज त्याने जे शरणागती पत्करली त्यासाठी हे सगळं होतं का? वाल्मिक कराड उतरतो आणि सरळ कार्यालयात जातो हे दृश्य आपण पाहिलं असंही कांबळे म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा हा प्लान होता, त्यामुळे ही शरणागती झाली असंही कांबळे म्हणाले. आम्ही लवकरच आझाद मैदानावर निषेध सभाही घेणार आहोत असंही कांबळे यांनी स्पष्ट केलं.

वाल्मिक कराडचा एन्काऊंटर झालाच पाहिजे-कांबळे

महाराष्ट्राचं सरकार आणि पोलीस हे वाल्मिक कराडसाठी काम करत आहे. जर संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असती तर आत्तापर्यंत वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करायला हवा होता तसंच एन्काऊंटर झालाच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांचा एन्काऊंटर झाला पाहिजे. भर रस्त्यात पोलिसांनी अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत त्यांचं संरक्षण आम्ही करु. इथले पोलीस संविधानाच्या विरोधात जाऊन काम करत असतील, तसंच सरकार संविधानाच्या विरोधात जात असेल तर जनताही शांत बसणार नाही असंही अशोक कांबळे यांनी म्हटलं आहे.

Story img Loader