भीमा-कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. त्याच्या चौकशीसाठी शरद पवार आपली साक्ष नोंदवणार आहेत. यासंदर्भात त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.
या आधीही जुलै महिन्यात शरद पवार यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा २३ फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. चौकशी आयोगाकडून शरद पवार यांच्यासोबतच तत्कालीन पुणे पोलीस अधीक्षकांना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे. पुण्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना समन्स पाठवण्यात आले आहे.
१ जानेवारी २०१८ रोजी पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता. या चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे आहेत. शरद पवार यांनी भीमा कोरेगाव येथील हिंसाचार हा संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं विधान केलेलं. त्यानंतर या प्रकरणात अॅड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता चौकशी आयोगाने शरद पवारांची साक्ष नोंदवण्यासाठी त्यांना बोलावलं आहे.
या हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी नऊ कार्यकर्त्यांना अटक केली होती. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी केली होती. हिंसाचार झाला तेव्हा राज्यात भाजपाप्रणीत सरकार सत्तेत होते आणि तेव्हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादी या विरोधी पक्षांनी केला होता.
भीमा कोरेगावच्या लढाईच्या स्मरणार्थ एल्गार परिषदेच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जानेवारी २०१८ रोजी गावात हिंसाचार झाला होता. काही संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. नंतर जून आणि ऑगस्ट २०१८ मध्ये, सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन, अरुण फेरेरा, वेर्नान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज आणि वरवरा राव या नऊ कार्यकर्त्यांना हिंसाचारात अटक करण्यात आली.