पंढरपूर : आगामी आषाढी यात्रा कालावधीत प्रयागराज येथे ज्या तंत्रज्ञानाने नदीतील पाणी स्वच्छ राहिले या तंत्राचा वापर करून आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांना भीमा नदी पात्रातील पाणी स्वच्छ राहील असे नियोजन केले आहे. तसेच यंदा आषाढी यात्रेत एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणर आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. आषाढी यात्रेला अजून अवधी आहे. असे असले तरी पालकमंत्री यांनी यात्रेला येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नियोजन व बैठकीला सुरुवात केली. यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे.
आषाढी यात्रेसंदर्भात प्रमुख संतांच्या पालख्यांचे प्रस्थान व कार्यक्रम जाहीर झाला आहे. आषाढीला अडीच महिना अवधी आहे. मात्र यंदा पहिल्यांदा पालकमंत्री यांनी आषाढी यात्रेच्या नियोजनासंदर्भात जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीआधी पालखी मार्ग, शहरातील प्रमुख रस्ते, मंदिर, नगरप्रदक्षिणा मार्ग, वाळवंट, नदी, चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर, दर्शन रांग आदींची पाहणी केली. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीनंतर येथील विश्रामगृह येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याआधी वारीच्या आधी पंधरा दिवस बैठक घेतली जात होती. त्यानंतर आलेल्या सूचना आणि तक्रारीचे निराकरण करणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे यंदा लवकरच यात्रेसाठी कामाला लागलो आहे. या वर्षी एआयसारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर यात्रा कालावधीत केला जाणार आहे. गर्दीचे नियोजन, वाहतुकीचे नियोजन, कुठे गर्दी जास्त होणार, कमी होणार असे विविध उपाययोजनांसाठी या तंत्राचा वापर केला जाणार आहे.
तसेच यात्रा कालावधीत नदीला पुरेसे पाणी तेही स्वच्छ राहील जेणेकरून भाविकांचे चंद्रभागा स्नान आणि आरोग्य चांगले राहील. यासाठी प्रयागराज येथे ज्या तंत्राचा वापर केला त्याचा उपयोग यंदा करणार आहे. सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात येत असताना अत्यावश्यक सेवा, पोलीस यंत्रणा, पालखी सोबतचे वाहनासाठी कायमस्वरूपी स्वतंत्र मार्ग करण्याचे नियोजन केले आहे. तसेच शहरात सध्या अस्वच्छता दिसून आली आहे. येथील मुख्याधिकारी यांना स्वच्छतेसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचे गोरे यांनी सांगितले. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत सावली देणारी आणि देशी वृक्षारोपण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संपूर्ण पालखी मार्गावर ग्रामविकास विभाग सोयीसुविधा देते. ते खाते माझ्याकडेच आहे. त्यामुळे यंदा मानाच्या पालख्या आणि इतर पालख्या यांना राहण्याची, पाण्याची, आरोग्य व इतर सुविधा देणार असल्याचे गोरे यांनी सांगितले आहे. २० जूनपर्यंत सर्व यात्रेची कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. पंधरा दिवसांनी आढावा घेतला जाईल. येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देणार असे ठामपणे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. उजनी धरणावर जलपर्यटनाचा प्रकल्प अहिल्यानगरला जाणार नाही. तसेच येथील पाणी कोणीही पळवून घेऊन जाणार नाही. मी पालकमंत्री आहे तोपर्यंत जिल्ह्यातून कोणतीही गोष्ट पळवून कोणीही नेणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
अरण विकासासाठी जमिनीचे अधिग्रहण
श्री संत सावता माळी महाराज संजीवन समाधी अरण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी आवश्यक असलेल्या चार एकर जमिनीचे भूसंपादन प्रशासनाने वेगाने करावे. अरण विकास आराखड्यासाठी शंभर कोटींचा निधी असून जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी वीस कोटींचा निधी ठेवण्यात आलेला आहे. या अंतर्गत विकासकामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन करण्याचे प्रस्तावित असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे समारक बांधणे तसेच श्री संत चोखामेळा यांचे स्मारक बांधणे यासाठी आवश्यक बाबी शासन स्तरावर करणे आवश्यक असल्याने याबाबतची लवकरच बैठक मुंबई येथे लावण्यात येणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.