अलिबाग-  ऐतिहासिक शहर महाडमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती देणारी भीमसृष्टी उभारण्यात येईल, यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली. ते महाड येथे चवदार तळे सत्याग्रहाचा ९८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते.

यावेळी रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, डॉ. भदंत राहुल बोधी, समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव, नागसेन कांबळे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चवदार तळे सुशोभिकरणासाठी यापूर्वीच सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम तातडीने सुरू करण्यात येईल, त्याच बरोबर राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाच्या तीन कोटीलाही लवकरच सुरुवात होईल, चवदार तळ्यावर येणारे अनुयायी येथील तळ्याचे पाणी प्राशन करतात, त्यामुळे तळ्याच्या पाण्यासाठी जलशुध्दीकरण प्रकल्प बसविला जाईल अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री शिरसाठ यांनी दिली.

चवदार तळे सत्याग्रहाचा ९८ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

अलिबाग- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळे सत्याग्रह केला होता. या घटनेचा आज ९८ वा वर्धापन दिन महाड मध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महामानवाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भिमसागर लोटला होता.

चवदार तळे तसेच क्रांती स्तंभावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भिमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, प्रा जोगेंद्र कवाडे, अबु आझमी यांनी डॉ आंबेडकर यांना अभिवादन केले. गेल्या दोन दिवसांपासून महाड शहरात शेकडो भिमसैनिक दाखल झाले होते. यानिमित्त डॉ आंबेडकर सभागृहात बौध्दजन पंचायत समितीच्या वतीने श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचा समारोप आज करण्यात आला. गुरुवारी सकाळपासूनच चवदार तळे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. रायगड पोलीस दलातर्फे यावेळी सशस्त्र मानवंदना देण्यात आली.

Story img Loader