तापलेले भिरा – भाग २

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकणातील भिरा या गावातील तापमानावरून भारतीय हवामान खात्यावर पुन्हा एकदा अविश्वासाचे सावट निर्माण झाले आहे. यापूर्वीही अवकाळी आणि वादळी पावसाच्या अंदाजावरून हवामान खात्याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. आता भिराच्या अधिकच्या तापमानावरून आणि त्याकरिता भारतीय हवामान खात्याने तपासणीसाठी पथक पाठवल्यामुळे हवामान खात्याने संशय दूर करण्यावर भर दिला आहे. हवामान खाते केवळ तापमान मोजून उष्णतेच्या लाटेचे भाकीत वर्तवीत आहे, मात्र मुळातच ‘हीट इंडेक्स’चा कोणताही विचार हवामान खाते करीत नसल्याचे दिसून आले आहे.

भिरामुळे संपूर्ण राज्यातच उष्णतेच्या लाटेचे भाकीत वर्तवण्यात आले. समाजमाध्यमातून आणखी याचा प्रसार झाला आणि परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वर्षी तापमान अधिक वाढणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी, दुपारी १२ ते ३ या काळात बाहेर जाऊ नये, असे संदेश सरकारनेसुद्धा प्रसारित केले. वास्तविक पठार भागात तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असेल तरच उष्णतेची लहर जाहीर करतात.  सरासरी तापमानाची पद्धत हवामान खात्याने बदलणे गरजेचे आहे. हवामान खात्याने हीच पद्धती कायम राखली आणि या वर्षीसारखी परिस्थिती पुन्हा आली तर तापमान ५० अंश सेल्सिअसवर गेल्याचा गवगवा होऊ शकतो. वास्तविकतेत सध्याचे तापमान हे मार्च महिन्याएवढेच असून किंचित वाढ आहे. उष्णतेच्या लहरीमध्ये आद्र्रतेची भूमिका महत्त्वाची आहे. आद्र्रता १५ ते २० टक्के असेल तर उष्णतेच्या लहरी निर्माण होत नाहीत, पण हीच आद्र्रता ५० टक्क्यांवर आणि तापमान ४० अंश सेल्सिअसवर गेले तर उष्णतेच्या लहरी निर्माण होतात आणि ते धोकादायकसुद्धा आहे.

तापमान सरासरी

राज्यात सरासरीपेक्षा सध्याचे तापमान चार ते पाच अंश सेल्सिअस अधिक असल्याचे दाखवण्यात येत आहे. मात्र राज्यातल्या बऱ्याच शहरांतले हे तापमान १९६१ ते १९९० च्या काळात मोजलेल्या तापमानाची सरासरी आहे. त्यात काही शहर, जसे की, पुणे त्यांच्या १९५१-१९८०च्या काळातल्या तापमानाची सरासरी देतात. मात्र जगभरात एकंदरीत १९७० नंतर तापमानात वाढ होत आहे आणि अलीकडच्या काही वर्षांत अधिक जाणवत आहे. त्यामुळे अचूक तापमान मोजायचे असेल तर अलीकडच्या ३० वर्षांच्या काळातील म्हणजेच १९८१ ते २०१० या काळातील तापमान पाहिले पाहिजे आणि त्यावरून सरासरी काढली पाहिजे. तरच सरासरी तापमान १९५१-१९८० पेक्षा निश्चितच जास्त असेल. दिल्लीसारख्या शहराचे सरासरी तापमान आता १९८१-२०१० यानुसार आहे.

उष्णतेच्या लहरी

  • पठार भागातील कमाल तापमान ४० अंशांच्या वर असेल आणि सरासरीच्या चार ते पाच अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असेल तर त्या ठिकाणी उष्णतेच्या लहरी निर्माण होतात. मात्र या उष्णतेच्या लहरीच्या व्याख्येत आद्र्रतेची काहीही भूमिका हवामान खात्याने नमूद केलेली नाही.
  • तापमान आणि आद्र्रता अधिक असेल तर शरीराला त्रास होतो. जून महिन्यात बऱ्याचदा तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस असते, पण आर्द्रता ५० टक्केहून अधिक असते. त्यात तापमान जरी अधिक नसले, तरी आद्र्रतेमुळे शरीराला ते अधिक वाटते. ज्यामुळे ‘हिटस्ट्रोक’सारखे होते.
  • सध्या जे ४०-४४ अंश सेल्सिअस विदर्भाचे तापमान आहे, हे लोकांना नवीन नाही. फक्त या वर्षी नेहमीपेक्षा ते किंचित अधिक झाले आहे.

हवामान शास्त्रज्ञांकडून भिरा उपकेंद्राची पाहणी

रायगडातील भिरा येथे नोंदलेल्या उच्चांकी तापमानानंतर कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञाने शुक्रवारी भिरा येथे भेट दिली. या ठिकाणी यापूर्वीही यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली असल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला. येथे यापूर्वी २७ एप्रिल २००५ रोजी ४९ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली असल्याने भीरा येथील नोंदीत फारसे नावीन्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हा परिसर डोंगराने वेढलेला आहे. डोंगर हे कातळाचे आहेत. हे कातळ तापल्याने तापमान वाढत असल्याचा अंदाज डॉ. कारेकर यांनी व्यक्त केला. आमच्या सर्व तापमापींची आम्ही दरवर्षी तपासणी करत असतो. जर नादुरुस्ती असेल तर आम्ही ते बदलतो. असे सांगून भिरा येथील तापमापीत बिघाड झाला असल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

हवामान खात्याने निश्चित अंदाज देणे गरजेचे आहे, नाही तर भिरासारखे प्रकरण अंगावर उलटून लोकांचा हवामान खात्यावरील विश्वास उडून जाईल. अवकाळी आणि वादळी पावसाच्या बाबतीतले यापूर्वीचे हवामान खात्याचे अंदाज चुकले आहेत. त्यामुळे आता ही चूक हवामान खात्याकडून होणे अपेक्षित नाही. गेल्या दहा वर्षांपासून भिराबाबत अधिक तापमानाची नोंद होत असतानाही हवामान खाते जुन्याच पद्धतीवर अवलंबून आहे. पाऊस असो किंवा तापमान, याचे अंदाज वर्तवताना हवामान खात्याने अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करणे गरजेचे झाले आहे. या प्रकरणानंतर तरी हवामान खात्याला जाग येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

प्रा. सुरेश चोपणेहवामान अभ्यासक

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhira temperature issue