वाई : अघोरी पूजा जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडून दाखवतो तसेच गुप्तधन देण्याच्या आमिषाने साताऱ्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीची ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने भोंदू बाबाला अटक केली आहे. पंढरीनाथ गणपती पवार उर्फ काका महाराज (रा कपडे भवानवाडी, ता पोलादपूर, रायगड) असे संबंधिताचे नाव आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंढरीनाथ पवार उर्फ काका महाराज यांनी संबंधित तक्रारदाराला अघोरी पूजा जादूटोणा चमत्कार करून हवेतून गुप्तधन काढून देतो अशा भूलथापा दिल्या आणि त्याच्याकडून वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरूपात ३६ लाख रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही गोष्ट न घडल्याने तक्रारदाराची फसवणूक झाल्याची भावना झाली. तक्रारदाराने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आणखी वाचा-सांगलीत ४५ लाखाचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त

या प्रकरणी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या सातारा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखा सक्रिय झाली. या शाखेने रायगड जिल्ह्यामध्ये काही संशयितांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे कसून चौकशी केली तेव्हा सातारा पोलिसांनी पोलादपूर येथून पंढरीनाथ पवार याला अटक केली. तसेच पवार याचे अन्य साक्षीदार यांची नावे पुढे येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक एस आर मते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या कारवाईमध्ये सातारा उपअधीक्षक राजीव नवले, वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र मस्के, पुणे प्रकटीकरण शाखेचे सुधीर मोरे, निलेश यादव, सुजित भोसले, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिठे इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड यांनी भाग घेतला होता.

आणखी वाचा-‘आठवी पास असूनही पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केलंत?’ भाजपाचे नरेंद्र मेहता म्हणाले, “मला अभिमान..”

भोंदुगीरी रोखण्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमावा – अंनिसची मागणी

पैशाचा पाऊस पाडून देतो, गुप्तधन काढून देतो, मौल्यवान आर.पी. कॉइन तयार करून ५० कोटी मिळवून देतो, विज पडलेल्या दगडाचे भांडे मिळवून देतो अशी आमिषे दाखवून ३६ लाख रुपयांना लुबाडणाऱ्या पोलादपूरच्या काका महाराजास सातारा पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन अटक केली.

सातारा पोलिसांनी स्वतः पुढाकार घेवून केलेल्या या कार्यवाहीचे स्वागत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.साताऱ्यातील वाई मध्ये काही दिवसांच्या गुप्तधनासाठी खड्डा खोदलेला होता, पाटणमध्ये देखील दोन वर्षांच्या पूर्वी नरबळीची घटना झाली होती. पाटण मधील दुर्गम भागात अजून देखील मोठ्या प्रमाणांत भोंदूगिरी चालते. म्हैसाळ येथे अशाच प्रकारची फसवणूक करून संपूर्ण कुटुंब मंत्रिकाने विष देऊन संपवले होते. या प्रकरणात पैशाचा पाऊस अशा गोष्टी असल्यानं म्हैसाळ सारख्या गोष्टी होऊ नयेत म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. जादुटोणा विरोधी कायद्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमावा अशी मागणी या निमित्ताने अंनिस करत आहे. अशा भोंदूगिरी करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी असे मत सातारा अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, डॉ. दीपक माने, हौसेराव धुमाळ, भगवान रणदिवे, प्रकाश खटावकर वंदना माने यांनी व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhondu baba who claimed secret money was arrested from poladpur mrj