यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक  २१ जून रोजी होत असून, अगदी सुरुवातीपासूनच मातब्बर नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने ‘कृष्णा’चा रणसंग्राम चांगलाच गाजतो आहे. कारखाना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला अन् लगेचच शेणोली येथे कारखान्याचे माजी अध्यक्ष व सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले व माजी मंत्री विलासकाका उंडाळकर हे एका व्यासपीठावर अाले. या वेळी उंडाळकरांनी विरोधकांना विकृत व मूल्यहीन म्हणून हिणवत सहकार पॅनेलच्या मताधिक्यासाठी कार्यकर्त्यांना व सभासदांना आवाहन केले.
शिवनगर (ता. कराड) येथील कृष्णा कारखान्याच्या २१ जणांच्या संचालक मंडळासाठी परवा गुरुवार (दि. २१) पासून प्रारंभ झाला असून, गेल्या दोन दिवसांत कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, मदनराव मोहिते तसचे त्यांच्या सहकाऱ्यांनी अर्ज दाखल केले. तर आज जोरदार शक्तिप्रदर्शन करीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले, त्यांचे पुत्र डॉ. अतुल भोसले, जगदीश जगताप, दयानंद पाटील, संग्राम विश्वासराव पाटील, जितेंद्र पाटील या मातब्बर उमेदवारांसह पॅनेलच्या सुमारे ५० हून अधिक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. सहकार पॅनेलची भव्य रॅली अन् सुरेश भोसले, अतुल भोसलेंनी आपल्या भाषणातून आज विरोधकांवर केलेल्या बोचऱ्या व सडेतोड टीकेमुळे आजचा दिवस भोसलेंचा राहिला. या पॅनेलमधून माजी मंत्री विलासकाका उंडाळकर समर्थकांनीही आपले अर्ज दाखल केल्याने भोसलेंसाठी आता उंडाळकरांची पतही जाहीररीत्या पणाला लागली आहे.
सोमवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. २६ मेला अर्जाची छाननी, २७ मे रोजी उमेदवारी यादी प्रसिद्ध होणार असून, तद्नंतर १० जूनपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. ११ जून रोजी उमेदवारांची अंतिम यांदी व चिन्हवाटप होईल. २१ जूनला मतदान, तर २३ जून रोजी मतमोजणी होणार आहे. कराड, वाळवा, कडेगाव, पलूस व खानापूर तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णाच्या सभासदांची संख्या जवळपास ५० हजारांच्या घरात पोहोचली आहे.
गतखेपेस मोहिते-भोसलेंचे मनोमिलन कृष्णाकाठावरून क्किकआऊट करण्याचे कसब उंडाळकरांचेच होते. पण, दरम्यानच्या राजकीय घडामोडीनंतर उंडाळकरांनी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्याशी पूर्णत: फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. गतखेपेचा सत्तांतराचा करिष्मा पाहता कृष्णाच्या सभासदांना राजकीय तडजोड अमान्य असल्याचेही म्हणावे लागत आहे. गतखेपेस मोहिते-भोसलेंचे मनोमिलन फसले होते. आता भोसले- उंडाळकरांचे मनोमिलन सभासदांच्या पचनी पडणार का? हाही कळीचा मुद्दा आहे.
‘कृष्णा’चे संस्थापक आबासाहेब मोहिते यांचे नातू अन् प्रस्थापितांचे सक्षम विरोधक म्हणून अविनाश मोहिते यांना स्वीकारणाऱ्या सभासदांची संख्या लक्षणीय आहे. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते हे संस्थापक पॅनेलच्या माध्यमातून ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत असलेतरी नुकतीच त्यांनी सातारा येथे शरद पवार यांची घेतलेली भेट पवार पॉवरचे पाठबळ मिळवून जाते की काय?अशीही शंका उपस्थित होत आहे. संस्थापक पॅनेलच्या पाच वर्षांच्या कालावधीत वाढलेले सभासद अन् मोहिते-भोसले या प्रस्थापित परिवाराला विरोध असणारी सभासद मंडळी संस्थापक पॅनेलच्या पाठीशी किती आक्रमकपणे उभी राहतात यावरही निवडणुकीची नेमकी गोळाबेरीज अवलंबून राहील.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे नेतृत्व मानणारे कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते व मदनराव मोहिते यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची ठरत आहे. परखड नेतृत्व असलेल्या मदनराव मोहिते यांनी विरोधकांवर मुद्देसूद व बोचरी टीका करून सभासदांचे लक्ष वेधले आहे. या उभय नेत्यांना पृथ्वीराज चव्हाण, राजेश पाटील-वाठारकर यांच्या गटाचा उघड पाठिंबा अपेक्षित असून, सध्या मोहितेबंधू सत्तेविना असल्याने सभासदांची त्यांना सहानुभूती मिळणार का? हाही महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. उंडाळकरांचा भोसलेंना मिळालेला जाहीर पाठींबा पाहता माजी मंत्री व वाळवा तालुक्याचे लोकप्रतिनिधी जयंत पाटील यांच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्त्व राहणार आहे. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचे प्राथमिक चित्र पाहता सत्तासंघर्षांची उत्सुकता ताणली जाण्याची चिन्हे आहेत.  

Story img Loader