भाजपाचे संकटमोचक नेते आणि राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बीएचआर पतसंस्थेच्या जमिनी अतिशय कमी दरात खरेदी केल्या. आपल्याकडे पुराव्याचे सीडी आणि पेन ड्राईव्ह आहेत आणि योग्य वेळ आल्यावर उघड करू,” असा गंभीर आरोप जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केला आहे. ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संकटमोचक नेते नावाने ओळखले जाणारे गिरीश महाजन सध्या अडचणी येण्याची चिन्हं आहेत. काही दिवसांपूर्वी शिक्षण संस्थाचालकाला धमकावल्याप्रकरणी महाजन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची चर्चा सुरू असताना बीएचआर पतसंस्था घोटाळ्यात महाजन यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी रविवारी (20 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन यांच्यावर विविध आरोप केले.

ललवाणी म्हणाले, “बीएचआर पतसंस्थेच्या जमिनी गिरीश महाजन यांनी अतिशय कमी दरात आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खरेदी केल्या. अनेक संस्था बळकावण्यासाठीही संबंधित संस्थेच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर त्यांनी पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना त्रास दिला. पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करण्याचा पॅटर्न गिरीश महाजन यांनीच राज्यभरात पसरवला. विरोधी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना जेरीस आणण्याचं काम महाजन यांनी करुन कार्यकर्त्यांना भाजपामध्ये येण्यासाठी भाग पाडलं. जामनेर पालिकेत ४१ टक्के जास्तीचे टेंडर भरुन त्यांनी जनतेची फसवणूक केल्याचा प्रकार साधना महाजन यांच्या काळात सुरु आहे,” असा दावा ललवाणी यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी विजय पाटील यांनीही गिरीश महाजन यांच्याविरोधात पुराव्याची सीडी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पारस ललवाणी यांनीही असाच दावा केला आहे. “आपल्याकडे पुरावे असलेली सीडी आणि पेन ड्राईव्ह आहे. गिरीश महाजन यांच्याकडून काही त्रास झाल्यास आपण ही सीडी जाहीर करु. पुढील काळात सर्व सत्य समोर येईल,” असं ललवाणी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhr scam girish mahajan paras lalwani evidence cd and pen drive bmh