सहा महिन्यांत राज्यातील ५६ टोल नाकेबंद करण्यात आले असून कुठे अवैध पद्धतीने टोलवसुली होत असेल तर, त्याविषयी वाहनधारकांनी शासकीय यंत्रणेला कळवावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी येथे केले. शहरातील अंबड येथे विविध संस्था व संघटनांच्या वतीने ‘नाशिक : काल, आज व उद्या’ या विषयावर सुधीर गाडगीळ यांनी भुजबळ यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी भुजबळ यांनी राजकीय व्यक्तींनी हार प्रमाणेच प्रहार स्वीकारण्याचीही तयारी ठेवली पाहिजे, असे नमूद केले.
गाडगीळ यांनी ‘लोकसत्ता’मधील टोलवसुली संदर्भातील वृत्त मालिकेचा उल्लेख करत भुजबळ यांना विचारले असता, त्यांनी निश्चित उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर टोल बंदच केला जातो. शासनाच्या परवानगीशिवाय टोल नाका सुरूच राहू शकत नाही, असे स्पष्ट केले. सिंहस्थापूर्वी नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी सुमारे १०० कोटींची मागणी करण्यात आली आहे. केवळ येवला परिसरातीलच रस्ते चकचकीत झाले असे नव्हे तर, राज्यातील २६ पेक्षा अधिक जिल्हे चौपदरी रस्त्याने जोडण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यास कित्येक पटीने निधी मिळवून देण्यात आला आहे, असेही भुजबळ म्हणाले.
आपल्यावर करण्यात येणाऱ्या कोणत्याही आरोपांमध्ये तथ्य नाही. राजकीय व्यक्तींच्या मुलांनी व्यवसाय करूच नये काय, मुंबईसारख्या शहराचे महापौरपद, कित्येक वर्षे मंत्रिपद भूषविलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीचे मुंबईत दोन फ्लॅट असू शकणार नाहीत काय, असा सवालही त्यांनी केला. राष्ट्रवादीत आपल्या विरोधात कोणत्याही प्रकारचे विरोधाचे वातावरण नाही. उलट ओबीसी आरक्षणासाठी शरद पवार यांनीही प्रयत्न केले, असेही भुजबळ यांनी नमूद केले. लोकप्रतिनिधी, प्रशासन व जनता यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच नाशिकचा विकास शक्य आहे.
शहरातील प्रदूषण दूर करण्यासाठीही एकत्रित प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी खा. समीर भुजबळ, आ. जयंत जाधव, विभागीय आयुक्त रवींद्र जाधव, जिल्हाधिकारी विलास पाटील, महापालिका आयुक्त संजय खंदारे, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांसह औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक ‘क्रेडाई’चे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी केले. आभार डॉ. शिरीष देशपांडे यांनी मानले.
अवैध टोल वसुलीची माहिती देण्याचे भुजबळांचे आवाहन
सहा महिन्यांत राज्यातील ५६ टोल नाकेबंद करण्यात आले असून कुठे अवैध पद्धतीने टोलवसुली होत असेल तर, त्याविषयी वाहनधारकांनी शासकीय यंत्रणेला कळवावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी येथे केले.
First published on: 10-12-2012 at 02:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhujbal appeal to give information on illegal toll information