मुंबई विमानतळास पर्याय म्हणून बघितल्या जात असलेल्या ओझर येथील एचएएल स्थित नाशिक विमानतळ टर्मिनलचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्र्यांनी खा. समीर भुजबळ, जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्यासह या कामाची पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. ३०० प्रवासी क्षमतेचे हे विमानतळ असून इमारतीचे क्षेत्रफळ ८,७१३ चौरस मीटर राहणार आहे. एकूण १४८ स्तंभांवर ही इमारत उभी राहणार असून काम सुरू आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे मुख्य अभियंता नागनाथ जळकोटे आणि अधीक्षक अभियंता पी. वाय. देशमुख यांनी दिली. विमानतळ निर्मितीसाठी महाराष्ट्र शासन आणि एचएएल यांच्यात करारनामा झाला होता. या प्रकल्पासाठी सुधारित प्रस्तावानुसार सुमारे ७० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. नाशिकचे वाढते औद्योगिकरण, आगामी कुंभमेळा, पर्यटन, धार्मिक महत्व यामुळे देश-विदेशातील भाविकांना व पर्यटकांना नाशिकचे विमानतळ सोयीचे ठरणार आहे. ओझर विमानतळावर विमानाची देखभाल दुरूस्ती प्रकल्प सुरू करण्यासाठीही शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमाने पार्किंगसाठी अहमदाबादला न्यावी लागतात. त्याऐवजी ती नाशिकला आणावीत असे आवाहन पालकमंत्र्यांनी संबंधित विमान कंपन्यांना यापूर्वीच केले आहे.

Story img Loader