स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये त्यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी पर्यटन खात्यामार्फत पुढाकार घेतला जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिली. ऊर्जा युवा प्रतिष्ठान आणि स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ यांच्यातर्फे येथे आयोजित स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचा शनिवारी समारोप झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी प्रास्ताविकात सावरकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची आग्रही मागणी केली होती.
गंगापूर रोडवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहित्य नगरीत झालेल्या या सोहळ्यात संमेलनाचे अध्यक्ष यशवंत पाठक, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकरराव गोखले, वा. ना. उत्पात यांसह ज्येष्ठ सावरकरप्रेमी उपस्थित होते. सावरकर यांचा इतिहास रोमांचकारी असून त्यांच्या स्वातंत्र्यलढाईला तोड नाही. ब्रिटिशांना न जुमानता सावरकर यांनी केलेली प्रखर आंदोलने आणि सध्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून केली जाणारी दिखाऊ स्वरूपाची आंदोलने यावर भुजबळ यांनी मार्मिकपणे बोट ठेवले. संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे अशी मागणी करणारे, परदेशी मालाची होळी करून स्वदेशीचा पुरस्कार करणारे, लंडनमध्ये जाऊन ब्रिटिशांविरोधात युद्ध पुकारणारे, मार्सेल्सच्या समुद्रात बोटीतून उडी मारण्याचे धाडस दाखविणारे, बॅरिस्टरची पदवी मिळून सनद न मिळालेले, असे देशातील एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होय. प्रखर देशभक्त, कवी, साहित्यिक आणि समाजसुधारक असणाऱ्या सावरकरांनी पददलितांना मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे म्हणून आग्रही मागणी केली. समाजातील अंधश्रद्धेला कडाडून विरोध केला, असे भुजबळ यांनी नमूद केले. महात्मा गांधी यांच्यापासून ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंतच्या मान्यवरांनी सावरकर यांच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या भावनाही भुजबळ यांनी या वेळी मांडल्या.
संमेलनाध्यक्ष पाठक यांनी संमेलनातील परिसंवादाला मिळालेल्या प्रतिसादाने आपण थक्क झाल्याची भावना व्यक्त केली. सावरकर यांनी जगण्यातील प्रश्नांना अतिशय यथार्थपणे उत्तर दिले. सावरकरांच्या साहित्यातून निर्माण होणारा संवाद आपल्याला जगण्याची प्रेरणा देतो. सावरकरांनी आपल्याला जगण्याचे समर्थ भान दिले. समाजाला विज्ञाननिष्ठेचा अंकुर दिल्याचे पाठक यांनी नमूद केले. प्रास्ताविक अजय बोरस्ते यांनी केले. या वेळी त्यांनी स्वा. सावरकर यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक नाशिकमध्ये उभारण्यात यावे, अशी मागणी केली. संमेलनाच्या विविध समित्यांवर यशस्वीपणे काम केल्याबद्दल संबंधितांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
वादविरहित संमेलन
संमेलनाच्या देखण्या आयोजनाविषयी संयोजकांना प्रशस्तिपत्रक देताना छगन भुजबळ यांनी अलीकडे होणाऱ्या एकूणच संमेलनांच्या विषयावर काही चिमटेही काढले. आजकाल संमेलन म्हटले की, वादविवाद, कोर्टबाजी, अध्यक्ष निवडणुकीवरून रंगणारे नाटय़ असे अनेक प्रकार समोर येतात, परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन त्यास अपवाद ठरले. असा कोणताही वादविवाद न होता हे संमेलन यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा