राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याऐवजी आपल्याच घरात खासदारकी व आमदारकी घेणाऱ्या छगन भुजबळ यांना ओबीसी घटकातील इतरांवर कितीही अन्याय झाला तरी त्याच्याशी काही देणेघेणे नसते. संकटात सापडल्यावरच भुजबळांना ओबीसींची आठवण येते, अशी तोफ डागत राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी भुजबळांना घरचा अहेर दिला आहे. येथे माळी समाजाच्या अधिवेशनात आपणास ओबीसी म्हणून टारगेट केले जात असल्याचे वक्तव्य पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अलीकडेच केले होते. तो धागा पकडून शेलार यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. दरम्यान, शेलारांच्या स्वभावदोषामुळे अनेक सहकारी दुरावल्यानंतर त्यांना नैराश्य आले असून भविष्य अंधकारमय दिसू लागल्याने ते भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करीत असल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. कैलास कमोद यांनी दिले आहे.
ओबीसी व माळी म्हणजे केवळ तेवढे भुजबळच का, असा सवालही शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला. खरेतर भुजबळ राजकारणात प्रवेश करण्यापासून आर्थिकदृष्टय़ा भक्कम होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर आमदार व खासदार असे सर्व काही म्हणजे भुजबळ हे समीकरण बनले. सत्ताकेंद्र डळमळीत होण्यास सुरुवात झाली की नेत्यांना घाबरविण्यासाठी भुजबळ समता परिषदेच्या बैठका, शक्तीप्रदर्शन व महामेळाव्यांचा बागुलबुवा, असे राजकारण करतात. ओबीसींमुळे खासदारकीच्या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. त्याची त्यांनी किती परतफेड केली, असा सवालही शेलार यांनी केला. आपल्याच घरात खासदारकी व आमदारकी, आपल्या मताप्रमाणे महामंडळाचे अध्यक्ष, विधान परिषदेचे आमदार, तरी आपणास टारगेट केले जात असल्याचा कांगावा कितपत सत्य आहे?, राजकीय ढग गडद झाले की, ओबीसी व माळी समाजावर अन्याय होत असल्याचा टाहो फोडला जातो, हे कितपत योग्य आहे, असा मुद्दाही शेलार यांनी मांडला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा