ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. आज आर.ओ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे उपस्थितांना संबोधित करतील. परंतु, या सभेआधीच संजय राऊत आणि शिंदे गटाचे आमदार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. “आम्ही दगडे मारून सभा बंद करणारे लोकं आहोत, त्यामुळे आम्हाला चॅलेंज करू नये”, असं थेट आव्हान आमदार गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना केलं होतं. यावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
“संजय राऊत कोणत्याच आंदोलनात नव्हते. शिवसेनेचं कसं करावं हे त्यांना माहिती नाही. आम्ही दगडं मारून लोकांच्या सभा उधळून लावणारी लोकं आहोत. त्यामुळे राऊतांनी चॅलेंज करू नये”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
छगन भुजबळांची प्रतिक्रिया काय
“तुम्ही दगडं मारून सभा उधळणार आहात. पण ते शिक्षण ज्या शाळेतील मास्तरांकडे घेतलं तेच येणार आहेत ना तिथे सभेला. ती काय दुसरी मंडळी नाहीत. तुमच्याच शाळेतील मुख्यध्यापक येत आहेत”, अशी सूचक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
हेही वाचा >> “आम्ही सभा उधळवून लावण्यात माहीर”, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याला अनिल परबांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
अनिल परबांचीही प्रतिक्रिया
“आम्ही सध्या सभा घेणारे आहोत, उधळवणारे नाही. सध्या आम्हाला सभा घ्यायची आहे, उधळवायची नाही. ज्यांना उधळवायची आहे त्यांनी यावं”, असं माजी मंत्री अनिल परब म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या सभेकडे लक्ष
खेड आणि मालेगावमध्ये जाहीर सभा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आज जळगावात सभा घेणार आहेत. आधीच्या दोन सभांमध्ये ठाकरेंनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी मुद्द्यांवर सरकारला घेरलं होतं, आज ते कोणत्या मुद्द्यांवरून सरकारला टीकास्त्र डागणार आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तसंच, एकीकडे ठाकरे आज जळगावात सभा घेणार असले तरीही १ मे रोजी मुंबईत वज्रमुठ सभा होणार आहे, या सभेसाठीही जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.