Bhushan Sing Holkar वाघ्या कुत्र्याची रायगडावरची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. वाघ्या कुत्रा होता असे कुठलेही पुरावे नाहीत त्यामुळे हे स्मारक हटवलं गेलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी या मागणीला विरोध दर्शवला आहे. दरम्यान होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी आता याबाबत भूमिका मांडली आहे.

भूषणसिंह होळकर काय म्हणाले?

“मी आमच्या घराण्याची भूमिका मांडण्यासाठी आलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की शिवाजी महाराजांनी कर्तृत्वाच्या जोरावर माणसं स्वराज्यासाठी निवडली जातीच्या जोरावर नाही. ती परंपरा गायकवाड, शिंदे, होळकर या घराण्यांनी जोपासली. वाघ्या प्रकरण समोर आल्यानंतर मला निदर्शनास आलं की लोकांनी वक्तव्यं केली. माझी इच्छा नव्हती बोलायची पण वाघ्या समाधीवरुन दोन्ही गट भूमिका मांडत आहेत. दोन्ही गटांसाठी हा अस्मितेचा विषय झाला आहे. छत्रपती शिवरायांच्या वेळी वाघ्याचं अस्तित्व होतं की नाही? यावर मी बोलणार नाही. कारण हा इतिहासाचा आणि अभ्यासकांचा विषय आहे. समकालीन पुरावे, कागदपत्रं काय सांगतात याला अनुसरुन वाघ्या अस्तित्त्वात होता की नाही हे ठरवता येईल. आत्ता जो वाद होतो आहे तो होऊ नये. त्या स्मारकाशी संबंधित अनेकांच्या भावना आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुरातत्व खात्याला माझी विनंती आहे की या प्रकरणी एक समिती नेमावी. समितीने दोन्ही बाजू ऐकून घेतली पाहिजे. इतिहास अभ्यासकांनाही त्यात समाविष्ट करा. इतिहास अभ्यासकांना बसवावं आणि त्यानंतर जो तोडगा काढता येईल. दोन्ही बाजू आम्ही ऐकून घेऊन शासन जी भूमिका वाघ्याच्या समाधीबाबत घेईल त्याबरोबर सगळ्यांनी राहिलं पाहिजे असं मला वाटतं. यामध्ये होळकरांचा रोल कुठे येतो? होळकरांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी देणगी दिली इथून. वाघ्या कुत्र्याचं प्रकरण शिवकालीन आहे. दोन्ही बाबी समजून घेतली पाहिजे. शिवसमाधीचा जिर्णोद्धार करायचा होता तेव्हा होळकरांचा संबंध आला. आता होळकरांचा संबंध येतो त्यामुळे शिवस्मारकाबरोबर आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. आता त्याविरोधात काही लोक भूमिका घेत असतील तर आम्हाला ते मान्य होणार नाही. ” असं भूषणसिंह होळकर यांनी म्हटलं आहे.

होळकरच शेवटपर्यंत इंग्रजांशी लढले

भूषणसिंह होळकर पुढे म्हणाले, “दोन्ही बाजूच्या संघटना बोलत आहेत. कुणाचा राजकीय हेतू काय? यात मला पडायचं नाही. या गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे असं माझं मत आहे. मी एका पत्रकार परिषदेत असंही ऐकलं की होळकर हे इंग्रजांना घाबरत होते. त्यांना एवढंच सांगायचं आहे की १८१८ पर्यंत यशवंतराव होळकर हेच इंग्रजांच्या विरोधात लढा देत होते. त्यानंतरही लढा दिला होता. होळकर इंग्रजांना घाबरतात हे वक्तव्य करणाऱ्यांचा इतिहासाचा अभ्यास नाही. समाजात तेढ निर्माण होईल अशा गोष्टी करु नका.” असंही भूषणसिंह होळकर यांनी म्हटलं आहे. मला या माध्यमातून आणखी एक गोष्ट सांगायची आहे की सातारचे छत्रपती जेव्हा कैद होते तेव्हा त्यांना सोडवण्यासाठी यशवंतराव होळकरांनी पुढाकार घेतला होता. असंही भूषणसिंह होळकर यांनी म्हटलं आहे.