Hemlata Patil : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेसनेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र, असं असतानाच ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला नाशिकमध्ये एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या काँग्रेसवर नाराज असल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी डॉ.हेमलता पाटील यांनी पक्षावर नाराजी देखील व्यक्त केली होती. दरम्यान, हेमलता पाटील यांनी आज (११ फेब्रुवारी) शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या काँग्रेस पक्षात होत्या. तसेच नाशिक महापालिकेत त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. तसेच प्रदेशाचं प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे.

हेमलता पाटील काय म्हणाल्या?

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मी कोणत्याही पदासंदर्भात आश्वासन घेतलेलं नाही. पण एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवणारे व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आपण देखील काम केलं पाहिजे असं वाटलं. त्यामुळे आज हा निर्णय घेतला. आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश दिला आहे. आता या पुढे शिवसेनेसाठी एकनिष्ठ काम करणार आहे. आज आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो होतो. पण लगेच पक्ष प्रवेश झाला आहे. १४ तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हा अनेक जणांचा शिवसेनेत प्रवेश होईल”, असं हेमलता पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रात जिकडे जातो तिकडे अनेकांच्या प्रवेशाचं सत्र सुरु आहे. आता मी दिल्लीत कार्यक्रमासाठी आलो. मात्र, दिल्लीत देखील पक्ष प्रवेश पडले. त्यामुळे आता तुम्हीच समजून घ्या की पक्षात इनकमिंग सुरु आहे. अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तसेच अनेक राज्यात शिवसेना वाढत आहे. आम्ही गेल्या अडीच वर्षांच्या काळात जे काही काम केलं त्या कामावर विश्वास ठेवून अनेकजण पक्षात प्रवेश करत आहेत”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.