महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाच्या बाजुने निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून संबंधित निर्णय अनपेक्षित असल्याचं म्हटलं आहे.
या घटनाक्रमानंतर ‘बिग बॉस फेम’ अभिनेते अभिजीत बिचुकले यांनीही महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे गट असो वा एकनाथ शिंदे गट असो, अशा सर्व राजकीय पक्षांना घरी बसवा आणि २०२४ ला महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या, असं विधान बिचुकले यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना अभिजीत बिचुकले म्हणाले की, मी लोकशाही मानणारा नागरिक आहे. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी तिथे जातात. मला अद्याप लोकांनी निवडून दिलं नाही. त्यामुळे येत्या काळासाठी मी एवढंच सांगेन की, जे झालं ते पुरेसं झालं. आता हे कुणीही असतील शिवसेना उद्धव ठाकरे गट असो वा शिवसेना एकनाथ शिंदे गट असो, जे कुणी असेल त्या सगळ्या पक्षांना एकदा घरीच बसवा. अभिजीत बिचुकले तुम्हाला एक चांगला पर्याय म्हणून आला आहे. अभिजीत बिचुकले अतिशय परखड मतं देणारा, कुणालाही न घाबरणारा आणि पूर्णपणे निर्व्यसनी आहे. माझी कोणतीही बायलॉजिकल चाचणी करा. मी पूर्णपणे निर्व्यसनी आहे. मी फक्त जेवण करतो, अशी प्रतिक्रिया बिचुकले यांनी दिली.
“असलं राजकारण थांबवायचं जनतेच्या हातात आहे. देशाची राजधानी दिल्ली भाजपाच्या ताब्यात नाही किंवा काँग्रेसच्या ताब्यात नाही. त्याचप्रमाणे २०२४ मध्ये महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या,” असं आवाहन अभिजीत बिचुकले यांनी केलं.
सत्तासंघर्षावरील निकालाबाबत विचारलं असता बिचुकले म्हणाले,”गंमत अशी आहे की, मी न्यायव्यवस्थेबद्दल बोलणार नाही. जेव्हा मला न्याय व्यवस्थेबद्दल बोलायची वेळ येईल. तेव्हा मी ते सत्र न्यायालय असेल तर मी उच्च न्यायालयात जाईन, खटला उच्च न्यायालयातला असेल तर मी सर्वोच्च न्यायालयात जाईन. सर्वोच्च न्यायालयातील न्यायव्यवस्थाही न्याय देत नसेल तर मी राष्ट्रपतींचा दरवाजा ठोठावेन. कारण राज्यघटनेत तशी तरतूद आहे.”