मुंबई-पुणे मार्गावर चालणाऱ्या सगळ्या बस सीएनजीवर, पश्चिम महाराष्ट्रातील गाडय़ांमध्ये इथेनॉल यासह डिझेल वाचविण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बस बांधणीमध्येही नवीन बदल करण्याचा विचार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. औरंगाबाद येथे रिक्षा व एस.टी. महामंडळातील कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना ते बोलत होते. महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी सुपर स्पेशॉलिटी हॉस्पिटल काढण्याविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच या बाबत निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
राज्यात परिवहन क्षेत्रातील बदलास केंद्रीय मंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला असून, सर्व योजनांच्या अनुषंगाने केंद्रीय करातून सवलत मिळेल, असे सांगण्यात आल्याचे रावते म्हणाले. रिक्षा व एस.टी. कर्मचारी संघटनांनी कोणत्या प्रश्नात लक्ष घालावे व कोणत्या समस्या सोडवाव्यात याचे मार्गदर्शनही त्यांनी केले. धोरणात्मक प्रश्नांवर तुम्ही बोलू नका, कर्मचाऱ्यांच्या हिताचे प्रश्न तातडीने सोडावा, असा सल्लाही त्यांनी दिला. बसस्थानकावरील अस्वच्छता दूर करणे हे प्राधान्याचे काम असल्याचेही ते म्हणाले.
वाहक-चालकांस होणारे आजार लक्षात घेऊन त्यांच्यासाठी रुग्णालयाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या बरोबरच मुलींना बसमध्ये छेडछाड होऊ नये, अशा प्रकारे बसवून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. बसच्या बांधणीत समस्या आहेत. बसचे इंजिन १५ टनांचे आहे. अन्य बसचे इंजिन एवढे मोठे नाही. त्यामुळे अधिक डिझेल लागते. यापुढे बांधणीच्या स्तरावर काही बदल करण्याची गरज आहे काय, याची तपासणी केली जात आहे. ते बदल करताना तंत्रज्ञ कमी पडणार नाहीत, याची काळजी घेऊ, असेही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांत खाते समजून घेताना काही घोटाळेही समोर आले आहेत. अगदी तिकि टाच्या मशीनमध्येही घोळ घातले असल्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
बसचा टोल बंद होणार
राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील टोलमधून एस.टी. सुटका करणार असल्याचे स्पष्ट करून रावते म्हणाले, की टोलचा भार तिकिटाच्या दरात लावला असता तर तो फारच कमी झाला असता. पण तसे न करता आतापर्यंत ९५० कोटी रुपये भरावे लागले आहेत. दरवर्षी सुमारे १४० कोटी रुपये टोलपोटी भरावे लागतात. ही रक्कम एस.टी.च्या तिजोरीत यावी, अशी उपाययोजना केली जात असून, यापुढे बसला टोल द्यावा लागणार नाही.
‘भिकारी बंद करा’
बसस्थानकांमध्ये भिकाऱ्यांचे येणे तातडीने बंद करा. ते आले की हाकलून द्या, असेच नाही तर त्यांच्या हाताला काम द्या. त्यांना जमेल ते काम दिल्यास. त्यांनाही स्वावलंबी बनविता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत, अशी सूचनाही त्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा