शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून शिवसेनेचा शिंदे गट आणि ठाकरे गटात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (२९ जुलै) ठाण्यात उत्तर भारतीयांची सभा घेत बंडखोरांवर हल्लाबोल केला. यावेळी ठाकरे गटाच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही बंडखोरांना गद्दार म्हणत टीका केली. याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. “आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदी यांची सुंदरता पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचाही उल्लेख केला. ते रविवारी (३० जुलै) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
संजय शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी घेतलेली सभा उत्तर भारतीयांसाठी होती असं म्हटलं. मात्र, ती सभा उत्तर भारतीयांसाठी नव्हती, त्या सभेत काही शिवसैनिक आणि काही उत्तर भारतीय होते. टीव्हीवर आलेल्या व्हिडीओत ते पाहू शकता. त्या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे त्या उत्तर भारतीयांबरोबर हिंदीत कोण बोलेल असा विचार करून राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदींनी भाषण केलं.”
“आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींचं सौंदर्य पाहून त्यांना खासदार केलं”
“ठाण्यातील मेळाव्यात केलेल्या या भाषणात प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दारांना माफी नाही, असं म्हटलं. प्रियंका चतुर्वेदी खरे तर काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तेथून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अत्यंत भयानक वक्तव्य केलं होतं. त्यांनी असं सांगितलं होतं की, आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींना त्यांचं सौंदर्य पाहून राज्यसभेची खासदारकी दिली,” असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
“गद्दार प्रियंका चतुर्वेदी दुसऱ्यांना गद्दार म्हणतात हा मोठा विनोद”
“असे प्रकार झाले आहेत हे स्वतः चंद्रकांत खैरेंनी सांगितलं आहे. हे माध्यमांकडेही आहे. त्या गद्दार प्रियंका चतुर्वेदी आता दुसऱ्यांना गद्दार म्हणतात. हा मोठा विनोद आहे,” असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं.