नाशिक येथे १०८ दिवस चालणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी अखंडपणे तेवणारी महाज्योत बनविण्याची कारागिरी कोल्हापूर जिल्ह्यातील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सूतगिरणीने केली आहे. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या ३६१७ किलोमीटर अंतराचा अखंड धागा महाज्योतीसाठी वापरण्यात आला आहे. तीन इंच जाडी व ७५० फुट लांब असणाऱ्या ज्योतीसाठी साडेतीन कोटी रुपयांचे तिळाचे तेल वापरण्यात आले आहे.
सिंहस्थ येथील कुंभमेळ्यासाठी अखंड तेवत राहणारी महाज्योत हवी होती. त्यासाठी संयोजक अखंड धाग्याची महाज्योत बनविणाऱ्या सूतगिरणीच्या शोधात होते. अखेर त्यांना रत्नाप्पाण्णा कुंभार सूतगिरणीच्या व्यवस्थापनाने महाज्योत बनविण्याची खात्री दिली. लगोलग सूतगिरणीचा कर्मचारी वृंद या कामामध्ये गुंतून राहिला. विशेष म्हणजे कसल्याही प्रकारचे व्यसन न करता कर्मचाऱ्यांनी हे पवित्र कार्य हाती घेतले. दोन महिन्यांच्या अथक परिश्रमातून महाज्योत साकारली गेली. ३०० किलो शुद्ध कापूस वापरून १६१७ किलोमीटर अखंड धाग्यातून ही महाज्योत बनवली आहे. हे काम वस्त्रोद्योगातील अभ्यासक डॉ. चंद्रकांत काणे यांच्या तांत्रिक नियोजनाखाली पार पडले.
अखंड धाग्याची बनलेली ही पहिलीच ज्योत आहे. तीन इंच व्यासाची आणि एवढय़ा मोठय़ा लांबीची अखंड ज्योत बनविणे हे मोठे आव्हान होते. या सूतगिरणीतील कर्मचाऱ्यांनी ते यशस्वीपणे पेलले. सिंहस्थ कुंभमेळय़ात ही ज्योत प्रज्वलित झाल्याने सूतगिरणीतील कर्मचाऱ्यांना दोन महिने अविश्रांत केलेल्या धावपळीबद्दल अतीव समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा