बडय़ा भाजप नेत्यांच्या नागपूर भेटीच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही आज संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी विविध विषयांवर तासभर चर्चा केली. गेल्या दोन आठवडय़ांपासून नागपुरात भाजपच्या बडय़ा नेत्यांची रीघ लागली आहे. आतापर्यंत माजी अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी यांनी नागपूर दौरा केला. सरसंघचालकांशी सर्वच नेत्यांनी केलेल्या चर्चेचा विस्तृत तपशील संघाच्या कडक शिस्तीमुळे बाहेर फुटलेला नाही.
मुख्यालयातून बाहेर पडल्यानंतर नितीन गडकरी यांनीही तोच राग आळवला. संघ मुख्यालयाबाहेर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना माझ्याजवळ सांगण्यासारखे काहीच नाही, असे त्यांनी प्रारंभीच स्पष्ट केले. सरसंघचालकांशी कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. फक्त देशाच्या आर्थिक प्रश्नांवर ऊहापोह झाला, एवढेच गडकरींनी सांगितले. अडवाणी, जोशी, राजनाथ सिंह आणि मोदी संघाचे अत्यंत जुने स्वयंसेवक आहेत. त्यांनी सरसंघचालकांना भेटणे ही नियमित बाब आहे. पक्षात कोणतीही नाराजी नाही, असे सांगतानाच सर्व आलबेल असल्याचा दावा गडकरींनी केला.
सरसंघचालकांच्या भेटीसाठी महालमधील वाडय़ातून गडकरी त्यांच्या अॅक्टिव्हा दुचाकीने बाहेर पडले तेव्हा त्यांचे समर्थक अवाक झाले. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने गडकरींना सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. दुचाकीवर बसून त्यांनी थेट संघ मुख्यालयाचा रस्ता धरला. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या सुरक्षा रक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली. महाल परिसरात बुधवारी आठवडी भाजीबाजार भरतो. सर्व दुकाने वाडय़ाच्या भोवताल लागलेली असतात. त्यामुळे कारने जाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. त्यामुळे गडकरींनी सरळ दुचाकीवर जाणे पसंत केले. संघ मुख्यालयात दुचाकी पार्क करून ते सरळ सरसंघचालकांच्या खोलीत शिरले. गडकरी ३ वाजता तेथे पोहोचल्यानंतर तासभर सरसंघचालकांबरोबर होते.
बडय़ा नेत्यांच्या पाठोपाठ संघाच्या मुख्यालयात गडकरींचीही हजेरी
बडय़ा भाजप नेत्यांच्या नागपूर भेटीच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही आज संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी विविध विषयांवर तासभर चर्चा केली. गेल्या दोन आठवडय़ांपासून नागपुरात भाजपच्या बडय़ा नेत्यांची रीघ लागली आहे. आतापर्यंत माजी अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी यांनी नागपूर दौरा केला.
First published on: 18-07-2013 at 02:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big leader of bjp as well as nitin gadkari presence in rss headquarters